घराच्या बाल्कनीत योगा करताना तोल गेल्याने तरुणी ८० फूट खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. मेक्सिकोत ही घटना घडली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणी सहाव्या माळ्यावरील आपल्या घराच्या बाल्कनीत योगाचा सराव करत असताना तिचा तोल गेला आणि थेट खाली जाऊन कोसळली. तरुणी योगाची पोझ देत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ती बाल्कनीला लटकत असल्याचं दिसत आहे.

हा फोटो तरुणीच्या मित्राने काढला आहे. तरुणी तोल जाऊन खाली कोसळणार याच्या काही वेळ आधी हा फोटो काढण्यात आला होता. दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला.

टेरजा असं या तरुणीचं नाव असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. जवळपास ११ तास तिच्यावर सर्जरी करण्यात आली. गुडघे आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली असून सर्जरी करुन प्रत्यारोपण करावं लागणार आहे. यामुळे तरुणी पुढील तीन वर्ष चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुणी ८० फूट खाली कोसळल्याने जवळपास ११० हाडं मोडली आहेत. तरुणीचे हात, पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

तरुणीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली असून रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. यानंतर १०० जणांनी मदत केली. तरुणीची प्रकृती अद्याप गंभीर आहे.