Selfie Day आज सेल्फी डे आहे. खरं तर सेल्फी म्हणजे तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे. कोणत्याही प्रसंगात सेल्फी घेतल्याशिवाय आपली गाडी पुढे सरकतच नाही. सेल्फीचा ट्रेंड नवीन होता त्यावेळी ‘लोक आपलेच फोटो कसे काय काढू शकतात?’ असं म्हणत त्याची यच्छेद खिल्ली देखील उडवली होती. पण, नंतर सेल्फीचा ट्रेंड इतका वाढत गेला की सेल्फी कुठे घ्यायचा याचंही भान लोकांना राहिलं नाही. काहींनी तर सेल्फीच्या नादापायी जीवही गमावले. तर काही याच सेल्फीमुळे प्रसिद्धही झाले. इतकंच नाही तर आज अनेक देशांत उत्तम सेल्फी कसा घ्यावा याचं रितसर शिक्षणही दिलं जातं.

काही महिन्यांपूर्वी एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. सेल्फीत आपला चेहरा जास्त विद्रुप किंवा वाईट दिसतो या एकमेव कारणामुळे अनेक जण सेल्फी काढले की ते लगेच डिलीट करतात किंवा सेल्फी घेणं टाळतात. सेल्फीत अनेकदा नाक खूपच मोठं दिसतं अशाही तक्रारी बऱ्याच जणांनी केल्या आहेत. या संशोधनात सेल्फी घेताना आपण वाईट का दिसतो? याची तांत्रिक बाजू मांडली होती. फोटो घेताना कॅमेरा आणि व्यक्ती यामध्ये ठराविक अंतर असतं. हे अंतर किमान पाच फुटांचं असतं. पण सेल्फी घेताना मात्र ते कमी होतं. सेल्फी घेताना मोबाईल आणि आपला चेहरा यामध्ये साधरण बारा इंचाचं अंतर असतं. हे अंतर खूपच कमी असल्यानं नाक ३०% मोठं दिसतं त्यामुळे सेल्फी वाईट येतात असं या संशोधनात म्हटलं आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल चेहऱ्यापासून जितका लांब असेल तितका सेल्फी उत्तम येईल असं संशोधनात म्हटलं आहे.

JAMA फेशिअल प्लास्टिक सर्जरीनं हे संशोधन प्रकाशित केलं होतं. सेल्फीमध्ये वाईट दिसत असल्यानं अनेकजण प्लास्टिक सर्जरी करायला येतात पण दोष त्यांच्या दिसण्याचा नसून तांत्रिक कारणामुळे फोटो खराब येतात हे त्यांनी या संशोधनातून दाखवून दिलं आहे.