मान कौर फक्त १०१ वर्षांच्या आजी. सध्या या ‘फिट अँड फाईन’ आजी न्यूझीलंडमध्ये खूपच ‘हिट’ झाल्या आहेत कारण आजींनी येथे पार पडलेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ऑकलंडमध्ये सोमवारी ‘वर्ल्ड मास्टर्स गेम्स’ स्पर्धा पार पडली. यातील शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत मान कौर या देखील सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे शंभरी ओलांडलेल्या त्या एकमेव स्पर्धक होत्या. आता त्या शर्यत पूर्ण करतील की नाही अशीच अनेकांना शंका होती पण आजींनी मात्र शर्यत पूर्ण केलीच पण सुवर्णपदकही पटकावत अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. १ मिनिट १४ सेकंदात त्यांनी ही शर्यत पूर्ण केली.

आजींची ही कमाल पाहून न्यूझीलंडमध्ये त्यांना आता सगळेच ‘मिरॅकल ऑफ चंदीगढ’ याच नावाने ओळखतात. या स्पर्धेत जवळपास २५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. वयाच्या ९३ व्या वर्षी धावपटू म्हणून आजींने आपल्या करिअरची सुरूवात केली. आपल्याला याची प्रेरणा मुलांपासून मिळाली असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. गेल्या आठ वर्षांपासून मान कौर धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये आवर्जुन सहभागी होतात. स्पर्धेच्या सुरुवातीला मान यांची आरोग्य चाचणी करण्यात आली होती, मान काही या शर्यतीत धावू शकणार नाही असेच अनेकांना वाटले होते. पण आश्चर्य म्हणजे मान यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले . फक्त १ मिनिट १४ सेकंदात १०० मीटरची शर्यत पूर्ण करुन त्यांना इथल्या हजारो स्पर्धकांना मागे टाकले. मान स्पर्धेत सहभागी झाल्या हिच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया या स्पर्धेच्या आयोजकांनी दिली.

मान गेल्या आठ वर्षांपासून धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत तसेच त्यांनी अनेक स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. जगभरात होणाऱ्या मास्टर्स गेम्स स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. बुधवारी होणाऱ्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तसेच गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेसाठीही त्यांनी आपले नाव नोंदवले आहे.