ख्रिसमस म्हटलं की लहान मुलांमध्ये क्रेझ असते ती सांताक्लॉजची. आता त्यापेक्षाही अधिक सांता आपल्याला काय गिफ्ट देणार याकडे चिमुरड्यांचं लक्ष असते. अशातच एका चिमुरड्याचं एक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. चिमुरड्यानं सांताक्लॉजकडे केलेली मागणी पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. त्यानं सांताकडे आपल्याला चांगले बाबा हवे आहेत अशी मागणी केली आहे.

जॅक असं या मुलाचं नाव आहे. तो आपल्या आईसोबत आश्रमात राहतो. कौटुंबिक हिंसाचारामुळे त्रस्त असलेल्या लोकांना या आश्रमात राहण्यास जागा दिली जाते. एका सामाजिक संस्थेनं जॅकचं हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वडिलांमुळे मला आणि आईला आपलं घर सोडावं लागलं. माझ्या वडिलांना त्यांना हवं ते मिळालं. आईनं मला आता आपल्याला घर सोडायला लागणार असल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला आता अशा ठिकाणी जायचंय तिकडे आपल्याला कोणालाही घाबरून राहण्याची गरज भासणार नसल्याचं तिनं सांगितलं, असं त्यानं पत्रात लिहिलं आहे.

मला दुसऱ्या मुलांशी बोलण्याची इच्छा नाही. सांता तू या ख्रिसमसला येशील का? या ठिकाणी आमच्याकडे काहीच नाहीये. तू येताना पुस्तकं, डिक्शनरी, कंपास आणि घड्याळ घेऊन येशील का? आणि मला चांगले बाबादेखील हवे आहेत. तू त्यांना घेऊन येशील का? अशी लोभसवाणी मागणी त्यानं सांताकडे केली आहे.