Ananat Ambani Lord Ram Comment: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा, अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसह विवाहबंधनात अडकणार आहे. या भव्य दिव्य ‘अंबानी विवाहसोहळ्या’आधी जामनगर येथे रिलायन्स ग्रीन्समध्ये यांचे विवाहपूर्व कार्यक्रम सुरू झाले आहेत. या विवाह सोहळ्यामुळे अनंत अंबानी हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहेच पण मागील काही दिवसात अनंत अंबानींचे काही प्रकल्प व विधाने सुद्धा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला माहीतच असेल की, अलीकडेच अंबानी समूहातर्फे अनंत यांनी ‘वनतारा’ या वन्यजीवांचे पुनर्वसन करण्याच्या कार्यक्रमाची घोषणा केली होती. तर आता अनंत अंबानी यांचा एक नवीन व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

इंडिया टुडेशी बोलताना अनंत अंबानी यांनी आकाश अंबानी आणि ईशा अंबानी या भावंडांबरोबर असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. अनंत अंबानी यांनी म्हटले की, “माझा भाऊ आकाश अंबानी माझ्यासाठी भगवान रामासारखा आहे आणि बहीण ईशा अंबानी ही देवीसारखी आहे. ते दोघेही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मी त्यांचा हनुमान आहे, माझा भाऊ माझा राम आहे आणि माझी बहीण माझ्यासाठी आईसारखी आहे. या दोघांनी नेहमीच माझे रक्षण केले आहे. आमच्यात कोणताही मतभेद किंवा स्पर्धा नाही. आम्ही एकत्र आहोत. फेविक्विकने चिकटल्याप्रमाणे आमची जोडी घट्ट आहे.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनंत व राधिका यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली होती. १ मार्च २०२४ ते ३ मार्च २०२४ असे जवळपास तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. या कार्यक्रमात अनेक जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनाही या प्री वेडिंग कार्यक्रमाची पत्रिका देण्यात आली आहे. अनंत व राधिकाच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाकडून १४ नवीन मंदिरांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच अलीकडेच काही कुटुंबांना अंबानींच्या कुटुंबाकडून अन्नदान करण्यात आले होते. यात अनंत व राधिका या दोघांनी अत्यंत प्रेमाने आमंत्रित कुटुंबाना जेवण वाढले होते.

अनंत अंबानी, यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीतुन पदवी प्राप्त केली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रमुख पदांवर अंबानींचा धाकटा पुत्र कार्यरत आहेत. रिलायन्स 02C आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी यांसारख्या उपक्रमांच्या संचालकपदाची जबाबदारी सुद्धा अनंत अंबानींवर सोपवण्यात आली आहे. अंदाजानुसार अनंत अंबानी यांची एकूण संपत्ती ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.