भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनंत व राधिका यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाची पत्रिका समोर आली होती. या पत्रिकेत अनंत व राधिका यांच्या लग्नाअगोदर कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहेत, याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाचे लग्नाअगोदरचे कार्यक्रम पार पडणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून ३ मार्च २०२४ पर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.

दरम्यान, अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात जेवणाच्या मेन्यूत कोणकोणते पदार्थ ठेवले जाणार आहेत याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना भारतातील निरनिराळ्या शहरांमधील प्रसिद्ध पदार्थ चाखायला मिळणार आहेत. इंदौरवरून १३५ लोकांची टीम अनंत व राधिकाच्या लग्नातील जेवण बनवण्यासाठी येणार आहे. यामध्ये ६५ शेफ असणार आहे. हे शेफ तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभात दोन हजार ५०० पेक्षा अधिक पदार्थ बनवणार आहेत. यामध्ये एशियन, मेडिट्रोनियन, जॅपनीज, थाई, मैक्सिकन आणि पारसी पदार्थांचा समावेश आहे.

हेही वाचा- “प्रेमासाठी…” अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिलं जाणार मेड इन महाबळेश्वर गिफ्ट! Video एकदा पाहाच

अनंत -राधिकाच्या लग्नात कोण कोण येणार?

जागतिक पातळीवरील नामवंत व्यक्तींना अनंत व राधिका यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, मॉर्गन स्टॅनले सीईओ टेड पिक, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान या लग्नात सहभागी होणार आहेत. तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनाही अनंत व राधिकाच्या लग्नाची पत्रिका देण्यात आली आहे.