संपूर्ण भारतात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. वायव्य भारताला उष्णतेचा अधिक फटका बसत आहे. आग ओकणाऱ्या कडक ऊन्हातही देशाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात. राजस्थानच्या बिकानेरमधील वाळवंटातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान तापलेल्या वाळूवर पापड भाजताना दिसत आहे. बिकानेर हा राजस्थानमधील सर्वात उष्ण जिल्हा आहे. यावर्षी बिकानेरमधील तापमान ४६ अंश सेल्सियसच्याही पुढे गेल्याचे दिसले.

फ्रंटल फोर्स या एक्स अकाऊंटवरून सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता इंटरनेटवर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये बीएसएफ गणवेशातील एक जवान दिसत आहे. प्रचंड उकाड्यामुळे त्याने डोकं आणि चेहरा व्यवस्थित झाकलेला दिसतो. हातात बंदूक घेतलेला हा जवान वाळूवर पापड ठेवतो आणि वाळूने पापड झाकतो. काही सेंकद थांबल्यानंतर पापडावरील वाळू बाजूला सारून तो पापड बाहेर काढतो. यावेळी पापड पूर्णपणे भाजलेला दिसतो. भाजलेला पापड सदर जवान कडाकडा पापड मोडून दाखवतो.

“आपल्या जवानांना सलाम. बिकानेरच्या तप्त वाळूवर जवानाने भाजला पापड. या कडक उन्हातही मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले जवान तत्पर आहेत”, असे कॅप्शन फ्रंटल फोर्सने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे.