जगभरामध्ये करोनाचा उद्रेक होऊन आठ महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. जगातील १८० हून अधिक देशांमध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. करोनाचा फैलाव जगभरात होऊ लागल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउनबरोबरच इतर निर्बंध लादण्यात आले. अनेक देशांमधील लाखो लोकांना लॉकडानमध्ये रहावे लागले. सध्या जगभरातील १०० हून अधिक संस्था करोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्यापही या विषाणूवर परिणामकारक ठरणारी लस सापडलेली नाही. अनेक ठिकाणी लस आणि औषधांच्या चाचण्या सुरु झाल्या असल्या तरी या विषणूवर पुढील काही महिन्यांमध्ये अगदी तातडीने लस उपलब्ध होईल अशी शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि वेळोवेळी हात धुणे हेच या विषाणू पासून सुरक्षित राहण्याचे पर्याय आहेत. काही देशांमध्ये तर करोनासोबत जण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांनी हळूहळू टप्प्याटप्प्यात आपल्या येथील सेवा लॉकडाउननंतर पुन्हा सुरु केल्या आहेत. मात्र हे करताना काही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. एकंदरितच करोनानंतरचे जग हो करोना पूर्वीच्या जगापेक्षा वेगळे असल्याचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी या निर्बंधांना आणि करोना संसर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. खास करुन अमेरिकेमध्ये अशा लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे प्रशासन आणि आरोग्य खात्याकडून करोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी मास्क वापरण्याबरोबरच इतर सूचना केल्या जात असतानाच अमेरिकेमध्ये अनेकजण स्वातंत्र्याच्या नावाखाली या निर्बंधांकडे दूर्लक्ष करताना दिसत आहेत. अगदी मास्क न घालता फिरण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून एकत्र जमून पार्टी करण्यापर्यंत अनेक गोष्टी या करोना साथीच्या काळातही सुरु आहेत. अमेरिकेतमध्ये तर करोना पार्ट्यांचे आयोजन केल्याची माहितीही समोर आली आहे. इंटरनेटवर करोना पार्टी किंवा कोविड पार्टी असं सर्च केल्यास अनेक अमेरिकन प्रसारमाध्यमांनी या धोकादायक ट्रेण्डसंदर्भात वृत्तांकन केल्याचे दिसून येईल.

अमेरिकेतील अल्बामा येथील काही विद्यार्थ्यांनी नुकत्याच एका कोवीड पार्टीचे आयोजन केलं होतं. आता हे वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की पार्टीची ही अशी विचित्र आणि तितकीच भयंकर थीम का ठेवण्यात आली आहे. या पार्टीला उपस्थित राहणाऱ्या कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा करोना संसर्ग होतो हे तपासण्यासाठी  या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे करोनाबाधित रुग्णांनाही या पार्टीला आमंत्रित करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कोणाला करोनाचा आधी लागण होते हे जाणून घेण्यासाठी हा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे. बरं ज्या व्यक्तीला सर्वात आधी करोनचा संसर्ग होईल त्याला या पार्टीसाठी विकण्यात आलेल्या तिकिटींच्या पैशामधून ठराविक किंवा संपूर्ण रक्कम विजेता म्हणून दिली जाते. ट्युस्कॅलोसा शहरामध्येही अशा पार्ट्यांचे आयोजन केलं जात असल्याचे एपी या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

“मनी पॉट संकल्पना या पार्ट्यांचे आयोजन करताना राबवली जाते. या पार्टीमध्ये करोनाचा संसर्ग व्हावा म्हणून विद्यार्थी हजेरी लावतात. ज्याला संसर्ग होतो त्याला पैसे बक्षिस म्हणून देण्यात येतात. या गोष्टी भयंकर असून त्यांना काहीही अर्थ नाहीय,” असं अल्बामा शहरातील अधिकारी सोनिया मॅकेन्स्टी म्हणाल्या. या पार्ट्यांसंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर सोशल मिडियावर यावरुन विद्यार्थ्यांवर आणि आयोजकांवर टीकेची झोड उठली आहे. वेड्या लोकांवर इलाज करता येत नाही असा टोला अनेकांनी या पार्ट्यांसंदर्भातील बातम्यावर प्रतिक्रिया नोंदवताना लगावला आहे. तर अशा पार्ट्या म्हणजे बावळटपणाचा कळस असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.

या पार्ट्यांच्या आयोजनाच्या बातम्यांनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असली तरी सध्या तरी आमच्याकडे यासंदर्भातील कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे अल्बामा पोलिसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ट्युस्कॅलोसाच्या अग्निशामन दलाचे प्रमुख रॅण्डी स्मीथ यांनी अशा पार्ट्यांचे खरोखरच आयोजन केलं जात असल्याच्या वृत्ताला एपीशी बोलताना दुजोरा दिला आहे. आधी आम्हाला या अफवा असल्याचे वाटले नंतर मात्र डॉक्टरांबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांनाही या पार्ट्यांचे आयोजन होत असल्याची माहिती आम्हाला दिल्याचे स्मीथ म्हणाले.