तुम्ही ‘टाईम मशीन’ बद्दल ऐकलं, वाचलं असेल. या टाईम मशीनचा वापर करून तुम्ही एकतर भविष्यात तरी जाऊ शकता किंवा भूतकाळात तरी. या टाईम मशीन संकल्पनेवर अनेक चित्रपटदेखील आले. आता या झाल्या साऱ्या चित्रपटातल्या कथा. असा प्रसंग प्रत्यक्षात घडणं तसं दुर्मिळच. पण असा दुर्मिळ प्रसंग नुकताच घडला आहे.

१ जानेवारी २०१८ ला हवाईयन एअरलाइन्सचं ४४६ हे विमान ऑकलंडवरून रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी निघालं. या विमानाला उड्डाण करण्यास उशीर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास हे विमान होनोलुलुला पोहोचले. विषेश म्हणजे तेव्हा होनोलुलुमधील तारीख होती ३१ डिसेंबर २०१७. त्यामुळे आधीच नववर्ष साजरं करून नवीन वर्षांत पोहोचलेल्या या प्रवाशांना पुन्हा एकदा नवीनवर्ष साजरं करण्याची संधी मिळाली. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की १ जानेवारीला निघालेले विमान हे ३१ डिसेंबर २०१७ मध्ये कसे काय पोहचले असेल. खरं तर यांचे साधे उत्तर आहे ते म्हणजे वेळ. ऑकलंडमधील वेळ ही होनोलुलुपेक्षा काही तासांनी पुढे आहे म्हणूनच वेगवेगळ्या टाईम झोनमुळे प्रवाशांना काही तासांच्या फरकानं दोनदा नवीन वर्ष साजरं करण्याची संधी मिळाली.

Video : पायलटनं विमानात घातली एअर हॉस्टेसला लग्नाची मागणी

‘या’ गावात रेल्वे प्रशासनाचा कारभार स्थानिकांच्या हातात

अशी घटना काही पहिल्यांदाच घडली नाही. युनायटेड एअरलाइन्सच्या प्रवाशांनाही असाच अनुभव आला होता. १ जानेवारी २०१७ ला शंघाई मधून निघालेले युनायटेड एअरलाइन्सचे विमान सॅन फ्रॅन्सिस्कोला चक्क ३१ डिसेंबर २०१६ ला पोहोचले होते. एकाच वेळी दोन वर्ष अनुभवायाचा दुर्मिळ योग या प्रवाशांना मिळाला होता. शंघाई शहराची वेळ ही सॅन फ्रॅन्सिस्कोपेक्षा १६ तासांनी पुढे आहे म्हणूनच प्रवाशांना असा दुर्मिळ अनुभव घेण्याची संधी मिळाली होती.