किंग कोब्रा घरात घुसून कुटुंबाचा पाठलाग करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घऱात मूल जमिनीवर खेळत असताना घुसलेला जवळपास दोन मीटर लांब किंग कोब्रा वेगाने हालचाल करताना दिसत आहे. लहान मुलाचे आजोबा सापाला पाहिल्यानंतर मदतीसाठी आवाज देतात. नुकतेच आजारपणातून उठले असल्याने ते जास्त हालचाल करु शकत नव्हते. पण याचवेळी मुलाचे वडील मदतीसाठी धावत येतात. व्हिएतनाममधील घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,

आजोबा सापाकडे पाहून आरडाओरडा करताच तिथे एका कोपऱ्यात बसलेले मुलाचे वडील धावत येतात आणि मुलाला उचलून घरात धावत सुटतात. घरात गेल्यानंतर ते वडील आणि मुलाला सुरक्षित ठिकाणी ठेवतात. यावेळी ते परततात आणि मुख्य दरवाजा लावून घेतात. यावेळी कोब्रा वेगाना दरवाजाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

वडिलांनी मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर काही वेळाने कोब्रा साप येताना दिसत आहे. दरवाजा बंद असतानाही कोब्रा साप घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी दिसत आहे. आतमध्ये जाण्यासाठी एखादी फट आहे का शोधणार कोब्रा काही वेळाने माघारी फिरतो. कुटुंबाचं सुदैव असल्यानेच ते या संकटातून वाचले असं म्हणावं लागेल.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकरी या कोब्रा सापाच्या वेगावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

१४ जुलै रोजी व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे.