रक्षाबंधन या सणादिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे अनेक अफवांना उधाण आले आहे. रक्षाबंधन हा सण चंद्रग्रहण लागण्यापूर्वी साजरा करावा, या अंधश्रद्धेतून काही लोक एक दिवस आधी हा सण साजरा करणार आहेत. पण, अशा अफवांवर विश्वास ठेवून आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याची काहीच गरज नाही, असे मत प्रसिद्ध खगोलशास्त्राचे अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले. चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. त्यामुळे रक्षाबंधन दिवशी संपूर्ण दिवसभरात कधीही हा सण साजरा करु शकता, असा सल्लाही त्यांनी दिला.

चंद्रग्रहणाविषयी सोमण म्हणाले की,  सोमवारी ७ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहण होणार असले तरी त्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे करण्यास कोणतीही हरकत नाही.  हे चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, यूरोप आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे. सोमवार सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ( मुंबई ) चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशित दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. त्यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यानी पाहता येईल. ज्यांच्याकडे दुर्बिण किंवा द्विनेत्री असेल त्यांनी त्यातून चंद्रग्रहण पाहण्यास हरकत नाही. हे चंद्रग्रहण सॅरॉस चक्र ११९ क्रमांकातील आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ९४ हजार ७७० किलोमीटर अंतरावर असणार आहे.

यावर्षी श्रावण अमावास्येला सोमवारी २१ ऑगस्टरोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु ते ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण हवाई,उत्तर पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, यूरोपचा अतिपश्चिमेकडील भाग आणि पश्चिम आफ्रिका येथून दिसेल. अमेरिकेच्या मोठ्या भागातून या सूर्यग्रहणाची ‘खग्रास स्थिती’ दिसणार असल्याने जगाच्या अनेक भागातील खगोलप्रेमी ते मनोहारी दृश्य पाहायला अमेरिकेला जाणार आहेत. पुढच्या वर्षी बुधवार दि. ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.