हल्ली अनेक जण प्रदूषणमुक्त आणि बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे हल्ली अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होताना दिसत आहेत. पेट्रोल वा डिझेलपेक्षा कमी खर्चात जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी या स्कूटरचा वापर केला जातो. मात्र, काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर इलेक्ट्रिक स्कूटरमधील तांत्रिक अडचणी आणि आगीच्या घटनांसंबंधित अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अशातच एका यूट्यूबरनेही त्याच्या ओला स्कूटरबाबत एक पोस्ट केली आहे; ज्यात त्याने १.७५ लाख रुपये किमतीच्या ओला स्कूटरला चक्क भंगार, असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर आता अनेकांनी आपापले वेगवेगळे अनुभव शेअर केले आहेत.
सहा महिन्यांत बिघडली ओला स्कूटर
ऋषभ जैन नावाच्या एका एक्स युजरने ‘ओला’ इलेक्ट्रिक स्कूटरमधील समस्यांविषयी माहिती दिली आहे. त्याने एक्सवर एका लांबलचक पोस्ट केली आहे. त्यात ऋषभने खुलासा केला की, त्याने आधुनिक तंत्रज्ञानावर प्रेम करणाऱ्या त्याच्या वडिलांसाठी १,७५,००० रुपये किमतीत ‘Ola S1 Pro’ स्कूटर विकत घेतली. पण, अवघ्या सहा महिन्यांनंतर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या.
ऋषी सुनक अन् अक्षता मूर्ती यांनी सांगितलं आनंदी नात्याचं रहस्य; म्हणाले, “पहिल्यांदा मुलं…”
वडील पडले काळजीत
ऋषभने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “दररोज दुसऱ्या दिवशी त्याची स्क्रीन बंद होते आणि बाईक रीसेट करावी लागते. मग ही समस्या दूर होण्यासाठी पाच ते सहा मिनिटे लागतात. दोन वेळा सर्व्हिस सेंटरवर नेले; मात्र काहीच तोडगा निघाला नाही.
त्याने पुढे लिहिले, “आता स्कूटर सुरूही होत नाही. ॲपवर पिकअप किंवा मेकॅनिक होम व्हिजिटचा पर्याय नाही. सर्व्हिस सेंटर काही किमी अंतरावर आहे; पण ही खराब स्कूटर सर्व्हिस सेंटरमध्ये न्यायची कशी? त्यात ती चालविणारे माझे वडील वृद्ध आहेत?
दरम्यान, ऋषभची ही पोस्ट आता वेगाने व्हायरल होतेय; ज्यावर इतर अनेक जण आपले वेगवेगळे अनुभव शेअर करीत आहेत. एका युजरने लिहिले, “सर्वांत वाईट निर्णय. मी डिसेंबर २०२२ मध्ये स्कूटर खरेदी केली आणि आता बॅटरी काम करीत नाही. एक महिन्यापासून ती सर्व्हिस स्टेशनवर आहे. अत्यंत निकृष्ट सेवा.” दुसऱ्या युजरने लिहिले, “थँक गॉड! निदान तिचा स्फोट झाला नाही.” तिसऱ्या एका युजरने लिहिले, “मला भारतीय तंत्रज्ञान यशस्वी करायचे आहे; परंतु पुरावे नेहमीच उलट असतात. नवीन खेळाडूंकडून तुम्ही उत्तम तंत्राची अपेक्षा करू शकत नाही.”