विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुपारी चारच्या सुमारास स्वाक्षरी केली. मंगळवारी सकाळपासूनच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा राज्यामध्ये सुरु होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर इंटरनेटवर राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील शुभेच्छांचे मेसेज व्हायरल झाले आहेत.

मंगळवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यामध्ये सर्वच मंत्र्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर सहमती दर्शवली होती. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर लगेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?, ती कशी लागू केली जाते?, त्याचा काय परिणाम होतो? याबरोबर चक्क राष्ट्रपती राजवटीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

दरम्यान, अशाप्रकारे बहुमत मिळूनही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. देशामध्ये आजपर्यंत एकूण १३१ वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे.