माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या अ‍ॅपलमधील काही कर्मचाऱ्यांनी मी टू या मोहिमेच्या धर्तीवर अ‍ॅपलटू ही मोहीम सुरु केली आहे. कंपनीत काम करताना होणारा दुजाभाव आणि चुकीच्या वागणुकीसंदर्भात या मोहिमेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. अ‍ॅपल कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष टिम कूक आणि वरिष्ठांच्या नावे एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या खासगी माहितीची आणि खासगीपणाची कंपनीला थोडी सुद्धा चिंता नसल्याचा आरोप करण्यात आलाय.

या पत्राच्या सुरुवातील अ‍ॅपल कंपनीला तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांमधील विविधात आणि समानता जपली जाते यासंदर्भात कशापद्धतीने गर्व वाटतो याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. मात्र हीच गोष्ट प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांबद्दल अंमलात आणण्याची वेळ येते तेव्हा करण्यात आलेले दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये जमीन आस्मानाचा फरक असल्याचं म्हटलं आहे.

“अ‍ॅपलला आपल्या खासगी माहितीसंदर्भातील धोरणांचा फार अभिमान असला तरी त्यांना त्यांच्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या खासगी माहितीसंदर्भात फारशी चिंता असल्याचं वाटत नाही,” असं या पत्रात म्हटलं आहे. “जेव्हा आम्ही आजारपणाची सुटी घेतो किंवा अ‍ॅपल मेंटल आणि फिजिकल हेल्थ पार्टनर्सच्या माध्यमातून मदत घेतो तेव्हा आम्हाला आम्ही कोणती औषधं घेतो आणि वैद्यकीय माहिती अ‍ॅपल कंपनीला द्यावी लागते. दोन वर्षांची माहिती या वेळी द्यावी लागते,” असं कर्मचाऱ्यांने पत्रात म्हटलंय.

कामाच्या ठिकाणी अश्लील भाषेमध्ये केल्या जाणारी टीप्पणी, टीका, होणारा दुजाभाव आणि मानसिक छळ यासंदर्भात अंतर्गत यंत्रणेच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतरही काहीही मदत केली जात नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आलाय.

अ‍ॅपलने यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा आणि ज्या ठिकाणी सर्वांना सुरक्षित वाटेल आणि सर्वांना समान संधी तसेच वागणूक मिळेस असं वातावरण तयार करण्यावर भर द्यावा असा सल्ला पत्राच्या शेवटी देण्यात आलाय. पत्रातील मजकूर काय आहे पाहूयात…

“अ‍ॅपल नेहमीच त्यांच्यातील विविधता, एकता तसेच असं वातावरण निर्माण करणं जिथे कोणतीही व्यक्ती सर्वोत्तम काम करु शकते यासारख्या गोष्टींसाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. मात्र प्रत्यक्षात हे घडत नाही. आम्हाला या कंपनीमध्ये छळ आणि दुजाभाव मिळण्यासंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींकडून दिली जाणारी वागणूक ही चुकीची आहे. अ‍ॅपलच्या खासगी माहितीच्या धोरणानुसार आपण जेव्हा माहिती देतो तेव्हा आपली खासगी माहिती जगासमोर येण्याची भीती असते. मात्र आम्ही आजारपणाची सुटी घेतो किंवा अ‍ॅपल मेंटल आणि फिजिकल हेल्थ पार्टनर्सच्या माध्यमातून मदत घेतो तेव्हा आम्हाला आम्ही कोणती औषधं घेतो आणि वैद्यकीय माहिती अ‍ॅपल कंपनीला द्यावी लागते. दोन वर्षांची माहिती या वेळी द्यावी लागते. एकीकडे कंपनीला स्वत:च्या खासगी महितीसंदर्भातील धोरणांचा अभिमान आहे तर दुसरीकडे त्यांना कर्मचाऱ्यांच्या खासगी माहितीची काहीच चिंता नसल्याचं चित्र दिसत आहे.

आमच्यापैकी शेकडो लोकांनी त्यांना मिळणारी चुकीची वागणूक, अश्लील भाषेमध्ये केल्या जाणारी टीप्पणी, टीका, होणारा दुजाभाव आणि मानसिक छळ यासंदर्भात अंतर्गत यंत्रणेच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतरही काहीही मदत केली जात. आम्ही आमचे अनुभव सांगून थकलो आहोत.

अ‍ॅपलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून चांगल्या गोष्टी करण्याचं आम्ही आवाहन करतो. आम्ही असं भाष्य करतोय कारण अ‍ॅपलने विविधता, सर्वसमावेशक विकास आणि समानता यासंदर्भात दिलेला शब्द पाळला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्हाला अशा वातावरणाची अपेक्षा आहे जिथे प्रत्येकाचं स्वागत होईल आणि प्रत्येकाला समान संधी तसेच वागणूक मिळाले.”