सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे असं म्हटलं जातं. मागील काही वर्षांपासून बातम्यांबरोबरच दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी अगदी खरेदी, ऑनलाइन व्यवहार यासारख्या गोष्टींसाठीही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र याच सोशल मीडियावरुन मॉर्फ, एडिटेड पोस्टही व्हायरल केल्या जात असल्याचे आणि त्यामधून चुकीची माहिती लोकांना पुरवण्याचे उद्योगही काही समाजकंटकांकडून केले जातात. असाच काहिसा प्रकार मागील काही दिवसांपासून लोकसत्ता डॉट कॉमच्या बाबतीत जाणीवपूर्वक केला जात आहे.

ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन, लाइफस्टाइल आणि इतर क्षेत्रांमधील बातम्या देण्यामध्ये लोकसत्ता डॉट कॉम कायमच आघाडीवर असलेल्या मराठी वेबसाईट्सपैकी एक आहे. याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न लोकसत्ता डॉट कॉमच्या माध्यमातून करण्यात येतो. सोशल मीडियावरील कार्ड्स, पोल, कॅप्शन प्लीजसारख्या फोटोंमधून वाचक या उपक्रमांत आपला सहभाग नोंदवत असतात. प्रामुख्याने राजकीय वक्तव्ये, आरोप-प्रत्यारोपांवर वाचकांमध्ये संवाद घडवून आणण्यामध्ये ही कार्ड्स मोलाचे योगदान देतात.

मात्र याच कार्ड्समध्ये फेरफार करुन मागील काही दिवसांपासून ती लोकसत्ता डॉट कॉमच्या नावाने व्हायरल केली जात आहेत. वेगवगेळ्या सोशल मीडिया पेजेसपासून ते अगदी व्हॉट्सअपसारख्या माध्यमांवरही ही कार्ड व्हायरल केली जात आहे. यासंदर्भात काही नामवंत फॅक्टचेक करणाऱ्या वेबसाईट्सनीही लेख लिहिले आहेत. मूळ कार्डमधील मजकूराऐवजी खोडकर आणि दिशाभूल करणारा मजकूर, लोगो आणि इतर गोष्टी आहेत तशाच ठेऊन बदलला जातो, हे अशा फॅक्टचेक्समध्ये दिसून आलेलं आहे.

तरी सर्व वाचकांना विनंती आहे की अशाप्रकारचा मजकूर सोशल मीडियावर शेअर करु नये. एखादी संस्था अथवा व्यक्तीच्या नावाने खोटा मजकूर प्रसारित करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा आहे. असे मॉर्फ आणि एडिटेड फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळेच सोशल मीडियावर अशाप्रकारचे कार्ड आणि पोस्ट शेअर करताना सत्यता पडताळून त्या शेअर कराव्यात. लोकसत्ताच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा तर लोकसत्ताचं अधिकृत ट्विटर अकाऊंट तुम्ही येथे क्लिक करुन फॉलो करु शकता.