काही जाहिराती कायम लक्षात राहतात मग त्या कोणत्याही प्रोडक्टच्या असू द्या. नव्वदच्या दशकामध्ये जन्मलेल्यांच्या आठवणीत असणारी अशीच एक जाहिरात म्हणजे ‘अ‍ॅक्‍शन स्‍कूल शूज’ची जाहिरात. काय म्हणता नाही आठवत? थांबा

‘ओ हो हो स्‍कूल टाइम,
अ‍ॅक्‍शन का स्‍कूल टाइम…
क्‍लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट लेक्‍चर।
गुड… गुड मॉर्निंग टीचर।’

आता तरी आठवली का? आठवली ना… संपूर्ण जाहिरातच तुमच्या डोळ्यासमोर उभी राहिली असेल. याच जाहिरातीच्या सुरुवातीच्या दृष्यांमध्ये टाय बांधणारा कुरळ्या केसांचा मुलगा आजही अनेकांना चांगलाच लक्षात असेल. जवळजवळ दीड ते दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीमधील हा मुलगा आता काय करतो? कुठे असतो यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चला तर माग जाणून घेऊयात कोण आहे हा मुलगा आणि तो सध्या काय करतो.

या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या या कुरळ्या केसांच्या मुलाचे खरे नाव तेजन दीवानजी असे आहे. ‘अ‍ॅक्‍शन का स्‍कूल टाइम’बरोबरच तेजन लहानपण इतरही जाहिरांतीमध्ये झळकला होता. यामध्ये मॅगी आणि इतर ब्रॅण्डच्या जाहिरातींचा समावेश आहे. इतकेच नाही तो पहला नशा गाण्याचा जो रिमेक झाला होता त्यामध्येही झळकला होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘अ‍ॅक्‍शन का स्‍कूल टाइम’ जाहिरातीने. लहानपणी अभिनयाची आवड जोपासणाऱ्या तेजनने नंतर या श्रेत्राकडे पाठ फिरवली आणि तो अभ्यासामध्ये रमला.

जाहिरातीमध्ये शाळेत जाताना दिसणारा तेजन आता डॉक्टर झाला आहे. त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून तो रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजेच कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या रेडिएशन उपचारांचा तज्ज्ञ झाला आहे. तेजनने २००८ साली अमेरिकेतील नॉर्थ कॅरेलोना विद्यापिठामधून बायो मेडिकल इंजीनियरींगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डॉक्टर ऑफ मेडिसीनची पदवीचा अभ्यास सुरु केला. मेरीलॅण्ड स्‍कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्याने औषधांसंदर्भातील अभ्यासाची ही पदवी २०१३ साली मिळवली. त्यानंतर त्याने मेरीलॅण्डमधील बाल्टीमोर येथील मेडस्टर युनियन मेमोरियल रुग्णालयामध्ये एक वर्ष इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर त्याने मागील वर्षी मेरीलॅण्ड विद्यापिठाच्या वैद्यकीय केंद्रामध्ये आपला इंटर्नशिपचा कार्यकाळ पूर्ण केला.

२०१८ च्या शेवटी तो मियामी विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. तो सध्या सिल्वेस्टर कॉम्प्रीहेन्सीव कॅन्सर सेंटरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. तेथील विद्यार्थ्यांना तेजन रेडिएशन ऑन्कोलॉजी शिकवतो.