हत्तींचा कळप रस्ता ओलांडत असताना वाहनांच्या रांगा लागल्याचे अनेक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असतात. सामान्यपणे राष्ट्रीय अभयारण्यांमधून जाणाऱ्या रस्त्यांवर असे चित्र अनेकदा दिसून येते. मात्र पश्चिम बंगालमधील हसीमारा येथील लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

मागील महिन्याभरामध्ये जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून हत्तींच्या पराक्रमाचे अनेक मजेदार व्हि़डिओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अधिकाऱ्या असणाऱ्या सुशांत नंदा यांनी काही दिवसापूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती सोंडेने बांबूच्या सहाय्याने विजेच्या तारा बाजूला सरकवून जंगलामध्ये प्रवेश करताना या व्हिडिओत दिसला होता. तर त्या आधी काही दिवसांपूर्वी थायलंडमधील खाओ याई राष्ट्रीय अभयारण्यामध्ये एक हत्ती गाडीवर बसल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला होता. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे तो पश्चिम बंगालमधील भारतीय लष्कराच्या छावणीमधील कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याचा.

पश्चिम बंगालमधील डोरस येथील हसीमारा लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये एक हत्ती शिरला. कॅन्टीनमधील डायनिंग हॉलमध्ये हत्ती सोंड हलवत शिरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती पुढे चालत जाताना वाटेत येणाऱ्या खुर्च्या आणि टेबल सोंडेने उचलून इकडे तिकडे फेकताना दिसत आहे. हा हत्ती कॅन्टीनमध्ये शिरल्याने कर्चमाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकजण कपाटांमागे लपले तर काहींनी या हत्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अंड्याची कॅरेट, डब्बे वाजवून हत्तीला कॅन्टीनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर्माचारी करत होते. मात्र कशाचाच परिणाम झाला नाही. अखेर एक कर्मचारी कपाटच्या मागून थेट जळतं लाकूड हातात घेऊन हत्ती समोर आला आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर हत्ती हळूहळू मागे होऊ लागला. त्या कर्चमाऱ्याने हत्तीचा पाठलाग करत त्याला जंगलामध्ये पळवून लावले.

हसीमारा लष्करी छावणी ही चिलापाटा जंगलापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अनेकदा हत्ती या छावणीच्या आजूबाजूला येतात. मात्र अशाप्रकारे थेट कॅन्टीनमध्ये हत्ती शिरण्याची ही पहिलीच घटना होती.