साधारणपणे लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. या अडचणींमध्ये कधी नैसर्गिक संकट असतात, तर कधी मानवनिर्मित. त्यामुळे कोणतं संकट कधी आणि कसं उभं राहिल हे सांगता येत नाही. अशाच एका संकटाचा सामना ग्रीसमधील एका रिपोर्टरला करावा लागला आहे. खरं तर एखाद्यावर संकट आलं तर त्याला हसू नये, त्याच्या या काळात त्याला मदत करावी असं वारंवार सांगण्यात येतं. परंतु या रिपोर्टरमागे जे संकट लागलं होतं ते पाहून कोणालाही हसू येईल. इतकंच कशाला त्याच्यावर ओढावलेलं संकट पाहून स्टुडिओ अ‍ँकरलाही हसू अनावर झालं होतं.

ग्रीसमधील एक रिपोर्टर लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना त्याच्या मागे अचानकपणे एक डुक्कर लागलं. विशेष म्हणजे डुक्कर मागे लागल्यानंतर त्याची जी पळापळ झाली ते पाहून स्टुडिओमध्ये असलेल्या अ‍ँकर्सलादेखील हसू अनावर झालं. डुक्कर मागे लागलेल्या रिपोर्टरचं नाव लासोज मेंटीकोस किनेटा असं असून तो मॉर्निंग रिपोर्टिंगसाठी एका शहरामध्ये गेला होता. यावेळी त्याचं लाइव्ह रिपोर्टिंग सुरु असताना अचानकपणे एक डुक्कर त्याच्या मागे आलं आणि त्याला धक्का मारण्यास सुरुवात केली. हे डुक्कर इथवरचं थांबलं नाही तर तो चक्क या रिपोर्टरच्या मागे लागला.


दरम्यान, डुक्कर मागे लागल्यानंतर मेंटीकोस इकडे-तिकडे पळू लागला. सोबतच त्याने रिपोर्टिंग करत असतानाच हा डुक्कर कसा त्रास देतोय हेदेखील सांगितलं. त्यामुळे स्टुडिओमध्ये असलेल्या अ‍ँकर्सलाही हसू आलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने हा व्हिडओ ट्विटरवर शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले असून १.५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.