Viral Video: शहरात उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर आपण चष्मा, स्कार्फ, टोपी आणि मुख्य म्हणजे सनस्क्रीन हा पर्याय निवडतो. उन्हामुळे चेहऱ्यावर, हातावर काळे डाग किंवा रॅशेस येतात. पण, अशा अनेक समस्यांवर सनस्क्रीन हा उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे मार्केटमध्येही सनस्क्रीन विकण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. पण, जर हे सनस्क्रीन तुम्हाला कोणी मोफत दिलं तर? वाचून थक्क झाला असाल ना? तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेला सनस्क्रीनचे एक व्हेंडिंग यंत्र बसवण्यात आलं आहे.

नेदरलँडने सार्वजनिक ठिकाणी सनस्क्रीन व्हेंडिंग मशिन्स उभारल्या आहेत. व्हेंडिंग मशीनमध्ये निव्हिया सनस्क्रीनचा साठा करण्यात आला आहे. या देशात नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी विनामूल्य सनस्क्रीनचे वाटप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना जेव्हा सनस्क्रीनची गरज असेल तेव्हा ते सोईस्करपणे या व्हेंडिंग यंत्राचा वापर करू शकतात. व्हायरल व्हिडीओत एक महिला व्हेंडिंग यंत्राजवळ थांबते आणि मोफत सनस्क्रीनचा वापर करताना दिसत आहे. नागरिकांसाठी बसविण्यात आलेलं खास सनस्क्रीनचं हे व्हेंडिंग यंत्र तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…VIDEO: खाकीतील डान्सर अमोल कांबळे अन् जर्मनी टिकटॉकरची जुगलबंदी; मुंबई पोलिसांचा ‘हा’ जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का?

व्हिडीओ नक्की बघा…

नोकरी, व्यायसायानिमित्त जे दिवसभर घराबाहेर असतात, त्यांचे उन्हापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने नेदरलँडकडून हा खास उपक्रम राबविण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नेदरलँडचे काही नागरिक हे अनोखं व्हेंडिंग यंत्र पाहून थांबले आहेत. तसेच काही जण व्हेंडिंग यंत्रातील सनस्क्रीन हातावर घेऊन त्वचेवर लावताना दिसत आहेत. गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी सनस्क्रीन सर्वांना सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही व्हेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे. तुम्ही आतापर्यंत सॅनिटरी नॅपकीन, कोल्ड्रिंक्स किंवा पाण्यासाठी बसविलेल्या व्हेंडिंग मशिन्स तुम्ही पाहिल्या असतील. पण, येथे तर चक्क सनस्क्रीनसाठी व्हेंडिंग मशीन बसवण्यात आलं आहे; जे उन्हाळ्यात खूपच उपयोगी आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @ravihanda या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नेदरलँडमध्ये आता मोफत सनस्क्रीन व्हेंडिंग मशीन सार्वजनिक ठिकाणी ठेवल्या जात आहेत. बाकी फार काही सांगणार नाही’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच एका भारतीय नागरिकाने कमेंट केली आहे, ‘अशी सुविधा भारतात असू शकते का?’ एकूणच या खास उपक्रमानं सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.