भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याला नव-नवीन विक्रम रचतो आहे. प्रत्येक सामन्यात विराट धावांचा अक्षरशः रतीब घालतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट सध्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करणारा विराट शाळेत मात्र ढ होता. गणितात विराटला १०० पैकी फक्त ३ मार्क मिळायचे. खेळांवर आधारित एका कार्यक्रमाला हजेरी लावलेली असताना विराटने आपल्या शालेय दिवसांमधली ही आठवण सांगितली.

“शाळेत मला गणिताच्या परीक्षेत १०० पैकी ३ मार्क मिळायचे, मी एवढा हुशार होतो. गणित का शिकायचं हे मला कधीच समजलं नाही. मला गणित कधीच समजलं नाही. गणितातील त्या सुत्रांचा-प्रमेयांचा मला आयुष्यात कधीच उपयोग झाला नाही. मला कशीही करुन दहावीची परीक्षा पास व्हायचं होतं. कारण दहावीनंतर तुम्हाला हवा तो विषय निवडण्याची मुभा होती. मी आयुष्यात क्रिकेटमध्ये कधीही इतका सराव केला नसेल, तेवढा मी दहावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी सराव केला होता.” निवेदकाने विचारलेल्या प्रश्नाला विराटने मजेशीर पद्धतीत उत्तर दिलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतंच वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. टी-२०, वन-डे आणि त्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने यजमान विंडीजला व्हाईटवॉश दिला. विंडीज दौऱ्यानंतर भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.