सध्या आपल्यातील अनेक जण घरात कमी आणि ऑफिसमध्येच जास्तवेळ असतात. अशावेळी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. बाहेरगावच्या किंवा घरापासून कंपनी दूर असणाऱ्यांना अनेकदा जेवणाचा डबा आणण्यात अडचणी येतात. त्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये हल्ली जेवणाची सुविधा दिली जाते. मात्र ही सुविधा देताना कंपनीकडून कूपन दिले जातात. अशाप्रकारे कूपन देण्यापेक्षा एक अतिशय हटके आयडिया एका कंपनीने शोधून काढली आहे. आपल्या कल्पनेच्या पलिकडे असणारी ही पद्धत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

अमेरिकेतील व्हीस्कोनसिन कंपनीने आपल्या कर्माचाऱ्यांच्या हातात एक मायक्रोचीप बसवली आहे. या चीपचा आकार ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. ही चीप तांदळाच्या दाण्याइतकी लहान आहे. खाण्याचे पदार्थ मिळतात त्याठिकाणी ही चीप स्कॅन केल्यास तुम्ही कंपनीमध्ये कोणतेही पदार्थ खरेदी करु शकता. मात्र अशाप्रकारे चीप बसवायची का नाही याचे स्वातंत्र्य प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आले आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने ही अनोखी सुविधा आणली असून आतापर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी ही चीप बसविण्यासाठी पसंती दर्शविली आहे. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफीकेशनचा वापर करण्यात आला असून हाताचा अंगठा आणि पहिले बोट यांच्या मध्ये ही चीप बसविण्यात येणार आहे. इतकेच नाही तर ही चीप बसविण्यासाठी अवघ्या काही सेकंदांचा कालावधी लागत असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. केवळ खाण्याचेच पदार्थ नाही तर कंपनीच्या इमारतीत अॅक्सेस करण्यासाठी आणि आपल्या कॉम्प्युटरच्या अॅक्सेससाठीही ही चीप वापरण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.