जेवताना एखादी गोष्ट चुकून तोंडात गेली आणि नंतर लक्षात आल्यावर ती थुंकल्याची घटना आपल्यापैकी अनेकांसोबत कधी ना कधी गडली असेल. मात्र एका २७ वर्षीय टीकटॉक स्टार असणाऱ्या तरुणीने चक्क अ‍ॅपलचे एअरपॉड्स गिळल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. काही पोस्टच्या माध्यमातून एअरपॉड्स गिळल्याचा दावा करणारी ही तरुणी सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. औषधाच्या गोळीऐवजी चुकून आपण एअरपॉड्स गिळल्याचं तिने म्हटल्याचं वृत्त ‘द इंडिपेंडण्ट’ने दिलं आहे.

कारिल बेल्मार नावाच्या या महिलेने पोस्ट केलेल्या पॉडकास्टमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिलीय. “मी चुकून माझ्या डाव्या कानातील एअरपॉड गिळलाय. मी बेडवर लोळत असताना माझ्या एका हातात आयब्रुफेन ८०० गोळी आणि दुसऱ्या हातात माझ्या डाव्या कानातील एअरपॉड होते. त्यावेळी मी गोळी खाण्यास गेले तेव्हा गोंधळून मी चुकून एअरपॉड तोंडात टाकला आणि गिळला,” असं ही तरुणी सांगते.

गोळी समजून चुकून एअरपॉड गिळल्यानंतर आपल्याला काहीही त्रास झाला नाही असंही तिने आपल्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं आहे. आपल्याला उटली किंवा मळमळल्यासारखंही झालं नाही असंही बेल्मार म्हणाली. आपल्या सोबत घडलेल्या या घटनेमधून लोकांनी धडा घ्यावा या हेतूने आपण अनुभव कथनाचा हा व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं बेल्मारने म्हटलं आहे. अशापद्दतीने चुकून एखादी वस्तू गिळणारी आपण पहिली व्यक्ती नाही आणि शेवटचीही नसणार असंही बेल्मारने व्हिडीओत म्हटलं असून यामधून लोकांनी शिकवण घ्यावी अशी आपली इच्छा असल्याचं तिने सांगितलंय.

नंतर या तरुणीने एक्सरेचे काही फोटो टाकत आपल्या अन्ननलिकेमधून हा एअरपॉड पूर्णपणे पास होऊन शरीराबाहेर पडलाय असंही म्हटलंय. मात्र एअरपॉड आपल्या पोटामध्ये होते हा विचार फार विचित्र असल्याचा दावा या मुलीने केलाय.

मात्र एअरपॉड्स गिळण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. मॅसॅच्युसेट्समधील एका व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी झोपेत असतानाच एअरपॉड गिळला होता. नंतर या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ब्रॅड गौथेर असं या व्यक्तीचं नाव होतं. हे प्रकरण इतकं गंभीर झालं की डॉक्टरांनी एण्डेस्कोपीच्या मदतीने शस्त्रक्रीया करुन हा एअरपॉड ब्रॅडच्या शरीराबाहेर काढला.