News Flash

तुला राजी नाहीं तुका!

आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच.

सतराव्या शतकातील चौथे दशक आता उजाडले होते. आदिलशाही सरदार मुरार जगदेवने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. पुणे कसबा बेचिराग केला. त्याला आता एक तप उलटून गेले होते. बारा वर्षांपूर्वीचा दुष्काळ, त्यातच युद्धाची होरपळ हा जुना इतिहास झाला होता. तेथे आता नवा इतिहास घडणार होता. अकरा-बारा वर्षांच्या बाल शिवाजीसह जिजाऊ आपल्या या दौलतीची व्यवस्था पाहण्यासाठी जातीने पुण्यात दाखल झाल्या होत्या. पुण्यात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली होती. पेठा वसू लागल्या होत्या. व्यापार-उदीम सुरू झाला होता. देवळांतून घंटा किणकिणू लागल्या होत्या. त्यांचा प्रतिध्वनी बारा मावळांतून उमटू लागला होता.
आता पुन्हा एकदा गावागावांतील मंदिरांतून कथा-कीर्तनांचे फड रंगू लागले होते. कथेकऱ्यांच्या, कुणब्यांच्या मुखात तुकोबांचे अभंग रुळू लागले होते. तुकोबांचा नामलौकिक सर्वत्र पसरला होता. त्यांच्या दर्शनासाठी, त्यांची अभंगवाणी ऐकण्यासाठी भाविकांचे थवे इंद्रायणीतीरी जमत होते. त्या नांगरमुठय़ांच्या मनाच्या मशागतीचे काम तेथे जोरात सुरू होते.
आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच. शिष्यांकरवी अशा आणखी काही कथा पसरवाव्यात. सत्संग भरवावा. कीर्तनाच्या सुपाऱ्या वाजवून घ्याव्यात. संपत्ती जमवावी. दारी हत्ती-घोडे झुलवावेत. भक्तांच्याच देणग्यांतून कोठे देवळे स्थापावित, भक्तनिवास उभारावेत, पाणपोया बांधाव्यात. अशी तेव्हाचीही रीत होतीच. हे केले असते तर तुकारामांचे केवढे तरी मोठे संस्थान उभे राहिले असते आणि मग त्यांच्या दर्शनासाठी राजे-महाराज-जहागिरदारांचीही रीघ लागली असती. पण हे तुकोबा ‘आम्ही किंकर संतांचे दास। संत पदवी नको आम्हांस।।’ असे म्हणत होते. ‘नरस्तुती आणि कथेचा विकरा। हें नको दातारा घडों देऊ ।।’ हे त्यांचे मागणे होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांची भेट घडली होती की नाही हा वादविषय आहे. तुकोबांच्या सर्व पारंपरिक चरित्रकारांनी अशी भेट झाल्याचे रंगवून सांगितले आहे. इतिहाससंशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते मात्र ‘तशा (म्हणजे शिवाजी-तुकोबांच्या भेटीच्या) प्रसंगाची परिस्थिती तुकोबांच्या निर्याणापर्यंत नव्हती.’ गाथ्यात मात्र ‘शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविलें, तें अभंग’ येतात. त्यातून तुकोबांच्या वैराग्यवृत्तीचेच दर्शन घडते.
‘दिवटय़ा, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।’
पुढे ते म्हणतात,
‘तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।’
याचा अर्थ तुकाराम प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते आणि बायको-पोरे, घर-संसार त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडला होता असा नाही. तुकाराम अखेपर्यंत प्रपंचात होते हे विसरता येणार नाही. माणसाला जगण्यासाठी सतराव्या शतकातही पैसे लागतच असत. पण त्यासाठी भिक्षा मागणे त्यांना मंजूर नव्हते. ‘भिक्षापात्र अवलंबणें। जळो जिणें लाजिरवाणें’ हा त्यांचा बाणा होता. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेंच करीं।।’ हे त्यांचे सांगणे होते. तेव्हा त्यांना गोमांसासमान कोणते धन वाटत होते, ते कथेचा विकरा करून मिळालेले तथाकथित मानधन. स्वत:स हरीचे दास म्हणवून घेणाऱ्यांसाठी तुकारामांनी घालून दिलेला हा फार मोठा धडा आहे.
कीर्तन हा भक्तीचा एक सुंदर प्रकार. जगात ज्ञानदीप लावण्यासाठी संतांनी निवडलेले ते महत्त्वाचे माध्यम. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग। होय अंग हरिरूप।।’ अशा शब्दांत तुकोबांनी त्याची महती सांगितली आहे. ‘कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव’ अशा शब्दांत त्याची थोरवी गायली आहे. पण बहुधा तुकोबांना खूप दूरचे, अगदी एकविसाव्या शतकापर्यंतचे दिसत होते किंवा त्यांच्या काळीही कीर्तन या माध्यमाचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट भोंदूंचा सुळसुळाट झाला होता. अशा भोंदूंबद्दल बोलताना तुकोबांच्या वाणीला तलवारीची धार चढताना दिसते. ते बजावतात-
‘कीर्तनाचा विकरा मातेचें गमन।
भाड खाई धन विटाळ तो।।
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति।
इजवर पोट भरिती चांडाळ ते।।
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना।
भाड हे खाईना जननीची।।
तुका म्हणे त्यांचें दर्शन ही खोटें।
पूर्वजासि नेटें नरका धाडी।।’
कीर्तनासाठी बिदागी घेणारा हा मातृगमनी, भाडखाऊ. कारण हरिगुणाची कीर्ति ही तर हरिभक्ताची माता. तिच्यावर पोट भरणारा मातेची भाड खाणारा चांडाळच म्हणावा लागेल. अशाचे दर्शनही खोटे.
या अभंगाची एक गंमत आहे. तो देहूसंस्थानच्या गाथ्यात आहे. पंडिती गाथ्यात आहे. जोगांच्या गाथ्याने मात्र तो नेमका क्षेपक मानला आहे! पण त्याने काही बिघडत नाही. अन्य एका अभंगात त्यांनी पुन्हा हेच सांगितले आहे. –
‘उभ्या बाजारांत कथा। हें तों नावडे पंढरीनाथा।।
अवघें पोटासाठीं सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणवून।।
काय केलें रांडलेंका। तुला राजी नाहीं तुका।।’
एखादे आख्यान बिदागीच्या आशेने लावायचे हे फक्त पोटासाठीचे सोंग आहे. तेथे पांडुरंग नाही. अशा कीर्तनकाराला संतप्त तुकोबा ‘रांडलेका’ अशी शिवी देऊन सांगतात, बाजारात अशी कथा आणणे मला अजिबात अमान्य आहे.
त्यांनी त्यासाठीची एक नियमावलीच घालून दिलेली आहे.-
‘जेथें कीर्तन करावें। तेथे अन्न न सेवावें।।
बुका लावूं नये भाळा। माळ घालूं नये गळां।।
तट्टावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।’
ज्या ठिकाणी कीर्तन करायचे आहे, तेथे मोठा हरिनामसप्ताह सुरू असेल, गावजेवण असेल, यजमान मोठा पुढारी असेल, तरी तेथील अन्नाला हात लावू नये. फार काय, त्या ठिकाणचा फुकटचा बुक्का कपाळी लावू नये की माळ गळ्यात घालू नये. तुकोबांच्या काळी वाहतुकीचे साधन म्हणजे घोडे, तट्टे किंवा बैलगाडय़ा. कीर्तनकार घोडय़ावर बसून येवो की बैलगाडी घेऊन, त्याच्या इंधनाचा खर्चही त्याने घेऊ नये. तट्टे आणि बैलांसाठी गवताची काडीही मागू नये.
आणि कीर्तनकाराने, कथेकऱ्याने मागितली, तरी यजमानाने त्याला ती देऊ नये. कारण- तुकोबा वारंवार बजावत आहेत –
‘तुका म्हणे द्रव्य घेती।
देती तेही नरका जाती।।’
‘कथा करोनियां द्रव्य देती घेती।
तयां अधोगति नरकवास।।’
‘कथा करोनियां मोल ज्यापें घेती।
तेही दोघे जाती नरकामध्यें।।’
बिदागी घेणारा कीर्तनकार आणि त्याला ती देणारा अशा दोघांनाही नरकवास ठरलेला आहे.
तुकोबांच्या लेखी हरिदास म्हणजे ‘वीर विठ्ठलाचे गाढे’, ‘देवाहूनि बळी’. पण स्वत:ला हरीचे दास म्हणणारे, वार करतो तो वारकरी अशी व्याख्या सांगणारे, सत्तेपुढे मात्र झुकताना दिसतात. तुकोबा अशांना उद्देशून विचारतात-
‘म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज।
दीनासी महाराज म्हणसी हीना।।
काय ऐसें पोट न भरेसें झालें।
हालविसी कुले सभेमाजीं।।’
अरे हीन मनुष्या, कोणासही महाराज म्हणतोस, सभेमध्ये, कीर्तनामध्ये ढुंगण हलवून नाचतोस. पोटाची खळगी अन्य उपायांनी भरत नाहीत काय?
तुकारामांच्या या सवालामध्ये सात्त्विक संताप आहे, जनसामान्यांचे आध्यात्मिक शोषण पाहून पेटून उठलेले मन आहे.
भक्तीसारखा सोपा मार्ग सोडून लोकांना आडवाटेकडे ओढू पाहणाऱ्या धर्ममरतडांचा, धर्मपंथांचा सुळसुळाट झालेला ते पाहात होते. धर्माच्या नावाखाली कशा प्रकारचा भ्रष्ट व्यवहार चालतो याची त्यांना जाणीव होती. त्याची झळ त्यांनी सोसली होती. त्यावर कोरडेही ओढले होते. तसेच प्रकार वारकरी संप्रदायातही घुसू पाहात असतील तर ते त्यांना मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांच्या नजरेसमोर एका नैतिक समाजाचे स्वप्न होते. म्हणून ते आपल्या अभंगांतून कळकळीने सांगत होते –
‘आतां तरी पुढे हाचि उपदेश।
नका करूं नाश आयुष्याचा।।
सकळांच्या पायां माझें दंडवत।
आपुलालें चित्त शुद्ध करा।।’
त्या काळच्या लोकांना ही तळमळ किती समजली हे समजण्याचा मार्ग नाही. आजच्या काळात मात्र तुकोबांचे अभंग गात फिरणारेच त्यांच्या नैतिक मूल्यांना राजरोस पायदळी तुडविताना दिसत आहेत.
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:48 am

Web Title: sant tukaram abhang 3
Next Stories
1 नाठय़ाळाचे काठी देऊं माथां..
2 तुका लोकी निराळा : आम्ही बळकट झालो फिराऊनि!
3 याचे लागले पीसे..
Just Now!
X