कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर २००१ साली भारताचे दोन कसोटी ‘स्पेशालिस्ट’ राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध एक धमाकेदार कारनामा केला. पहिल्या डावात फॉलो-ऑन मिळाल्यानंतर या दोघांनी दिवसभर मैदानावर तळ ठोकत भारता एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या दोघांनी ३३१ धावांची भक्कम भागीदारी रचली. त्याच्या जोरावर भारताने ७ बाद ६५७ या महाकाय धावसंख्येवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे शेवटच्या एका दिवसात ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी करत शेवटच्या सत्रात ४६ धावा देऊन सात बळी घेतले.

Video : विराट-अनुष्कामध्ये रंगला क्रिकेटचा सामना

या सामन्यात द्रविड आणि लक्ष्मण या दोघांनी सामन्याचा चौथा दिवस पूर्ण खेळून काढला. याबद्दल लक्ष्मणने एका चॅट शो मध्ये सांगितले. “देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू हा अभिमानाने खेळत असतो. त्याला त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले याचा अभिमान असतो. टीम इंडियाकडून खेळताना आमचीदेखील हिच भावना होती. आम्हाला देखील संघासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. विशेषत: संघ अडचणीत असताना आम्हाला संघाच्या कामी यायचं होतं. आम्ही दोघं जेवढ्या वेळ खेळपट्टीवर होतो, तेव्हा एकदाही द्रविडने कंटाळा आल्यासारखा चेहरा केला नाही. आपण एक लढा देतोय अशा भावनेनेच तो खेळत होता आणि मला प्रोत्साहन देत होता”, असे लक्ष्मण म्हणाला.

विराटचा एक रिप्लाय अन् वादच संपला…

अख्खा दिवस खेळून काढण्याबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला की प्रत्येक षटक संपलं की आम्ही दोघं एकत्र यायचो आणि चर्चा करायचो. त्यात एक गोष्ट मात्र आम्ही सातत्याने केली. ती म्हणजे आम्ही एकमेकांना प्रत्येक षटकानंतर म्हणायचो ‘चांगलं चाललंय. आणखी एक षटक खेळून काढूया’. आम्ही खेळताना आम्हाला त्यातून एक महत्त्वाचा धडा मिळाला की जेव्हा तुम्ही मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जायचं असतं”, अशी आठवण लक्ष्मणने सांगितली.