News Flash

‘सेस्मॉलॉजी’चा अभ्यास

भूगर्भ हालचालींचा अभ्यास करणाऱ्या ‘सेस्मॉलॉजी’ विषयक अभ्यासक्रमांची माहिती-

| May 22, 2014 01:01 am

भूगर्भ हालचालींचा अभ्यास करणाऱ्या ‘सेस्मॉलॉजी’ विषयक अभ्यासक्रमांची माहिती-
पृथ्वीच्या अंतरंगातील हालचाली भूकंप, ज्वालामुखीच्या रूपाने आपल्या जिवावर बेततात, हे लक्षात आल्याने गेल्या काही वर्षांत या क्षेत्राचा सविस्तर अभ्यास आणि संशोधन केले जात आहे. यातून सेस्मॉलॉजी या स्पेशलाइज्ड ज्ञानशाखेचा उदय झाला असून या ज्ञानशाखेने गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. पृथ्वीच्या पोटातील हालचालींचा वेध घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून संभाव्य धोक्यांच्या तीव्रतेचे भाकीत वर्तवून, लोकांना आणि शासकीय यंत्रणेला सावध करण्यासाठी हे तज्ज्ञ कार्यरत असतात.
सेस्मॉलॉजी ही ज्ञानशाखा भूगर्भशास्त्र या मुख्य शाखेतून उदयाला आलेली शाखा आहे. भूकंप निर्मितीच्या विविध कारणांचा अभ्यास या ज्ञानशाखेत केला जातो. त्याचबरोबर भूपृष्ठाच्या सूक्ष्म अभ्यासावर याअंतर्गत लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे भविष्यातील संभाव्य भूकंपाची दिशा आणि ठिकाण ठरवणे आणि त्यासंदर्भात उपाययोजना करणे शक्य बनते.
या ज्ञानशाखेमध्ये ज्वालामुखी, समुद्रात उद्भवणारी त्सुनामीसारखी वादळे यांचाही अभ्यास केला जातो. आण्विक स्फोटकांचा भूगर्भीय हालचालींवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास आता या ज्ञानशाखेमार्फत केला जाऊ लागला आहे.
या ज्ञानशाखांमध्ये ढोबळमानाने निरीक्षण सेस्मॉलॉजी आणि सैद्धांतिक सेस्मॉलॉजी असे दोन भाग होतात. सैद्धांतिक सेस्मॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणितीय सिद्धांताचा उपयोग करून पृथ्वीच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी सातत्याने नवे तंत्र विकसित केले जाते. भूगर्भीय लाटांची निर्मिती आणि त्यांचे प्रसरण याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाते. निरीक्षण सेस्मॉलॉजीमधील तज्ज्ञ हे सैद्धांतिक सेस्मॉलॉजिस्ट्सनी विकसित केलेल्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष वापर करून भूकंपांची माहिती गोळा करून त्यांचे विश्लेषण करतात.
करिअर संधी
पृथ्वीच्या अत्यंत खोलवर चाललेल्या किंवा घडू पाहणाऱ्या हालचालींचा सूक्ष्म वेध घेण्यासाठी हे शास्त्र सातत्याने विकसित होत आहे. या शाखेतील तज्ज्ञ भूकंपनिरोधक इमारतीच्या बांधकामाच्या अनुषंगाने संबंधित परिसराचा सूक्ष्म भूस्तरीय अभ्यास करून सल्ला देऊ  शकतात. भूकंपापासून अधिक सुरक्षित राहू शकेल अशा इमारतींची गुणवत्ता व दर्जा वाढण्याच्या अनुषंगाने तसेच मोठमोठय़ा धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे तज्ज्ञ बांधकाम अभियंत्यांना मदत करू शकतात. या तज्ज्ञांचा उपयोग वायू, तेल आणि विविध प्रकारच्या धातूंच्या साठय़ांचा शोध आणि उत्खनन प्रक्रियेमध्ये होतो. जलसाठय़ांच्या शोधासाठीही या तज्ज्ञांचे सहाय्य घेतले जाते.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे गणित, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचे आकलन उत्तम असणे आवश्यक ठरते. भूगर्भशास्त्राचा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळणे सुलभ जाऊ शकते. भूगर्भशास्त्रातील विशेषत: भू-भौतिकीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी.) अधिक उपयुक्त ठरू शकते. उपयोजित भूगर्भशास्त्र (अप्लाइड जिऑलॉजी) या विषयातील पदव्युत्तर पदवीधारक सेस्मॉलॉजिस्ट म्हणून करिअर करू शकतात. सेस्मॉलॉजी या विषयातील पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांना मोठी झेप घेणे सुलभ जाते.
जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया, इंडियन मटिऑरॉलिजिकल डिपार्टमेंट, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट- हैदराबाद, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम- मुंबई, ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या संस्थांना सातत्याने या विषयातील तज्ज्ञांची गरज भासत असते. केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये तसेच खासगी उद्योग समूहांच्या संशोधन प्रयोगशाळेत संशोधनाच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि संशोधन विभागात करिअर करता येते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेस्मॉलॉजिस्टचे कार्यक्षेत्र हे अधिक सूक्ष्मतेकडे आणि अचूकतेकडे जाऊ लागले आहे. या क्षेत्रातील संशोधक पृथ्वीच्या अंतरंगातील सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींचा वेध घेऊ शकेल अशा उपकरणांचा विकास करत आहेत. त्यामुळे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून संभाव्य भूकंप धोक्याची शक्यता अचूकतेने वर्तवणे शक्य बनले आहे.
शैक्षणिक संस्था
*    इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी, धनबाद-
> एम.एस्सी. टेक इन अप्लाइड जिऑलॉजी
> एम.एस्सी. टेक इन जिओफिजिक्स
दोन्ही अभ्यासक्रम इंटिग्रेटड असून त्यांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अर्हता- भौतिकशास्त्र, गणित या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई-मेन आणि जेईई- अॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
संस्थेमार्फत एम.एस्सी. टेक इन अप्लाइड जिऑलॉजी आणि  एम.एस्सी. टेक इन जिओफिजिक्स हे दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अर्हता- संबंधित विषयातील पदवी. पत्ता- इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी, धनबाद- ८२६००४, झारखंड.
वेबसाइट- www.ismu.ac.in  ईमेल- query@ismu.ac.in
* आयआयटी, खरगपूरच्या डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी आणि जिओफिजिक्स : येथे भूगर्भशास्त्राशी संबंधित विविध कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
> एम.एस्सी. -एक्सप्लोरेशन जिओफिजिक्स
> एम.एस्सी.- अप्लाइड जिऑलॉजी.
दोन्ही अभ्यासक्रम इंटिग्रेटेड स्वरूपाचे असून पाच वर्षांच्या कालावधीचे आहेत. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई-मेन आणि जेईई- अॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
> एम.एस्सी.- जिओफिजिक्स. कालावधी- दोन वर्षे.
> एम.एस्सी.- जिओलॉजिकल सायन्स. कालावधी- दोन वर्षे.
> एम.एस्सी.- पीएच.डी. डय़ुएल डिग्री इन जिओफिजिक्स
> एम.एस्सी.- पीएचडी डय़ुएल डिग्री इन जिओजॉजिकल सायन्स. या दोन्ही अभ्यासक्रमांना जॉइन्ट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM) या प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
> एम.टेक.- एक्सप्लोरेशन जिओसायन्स
> एम.टेक.- कॉम्प्युटेशनल सेस्मॉलॉजी. अभ्यासक्रम क्रमांक ८ आणि ९ ला प्रवेश ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स (GATE) द्वारे दिला जातो.
 पत्ता- हेड ऑफ डिपार्टमेन्ट, डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी आणि जिओफिजिक्स, आयआयटी खरगपूर- ७२१३०२.
    वेबसाइट- www.iitkgp.ac.in  
* डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्स, आयआयटी रुरकी.
> एम.टेक.- जिओफिजिकल टेक्नॉलॉजी
> एम.टेक.- जिऑलॉजिकल टेक्नॉलॉजी. दोन्ही अभ्यासक्रम इंटिग्रेटेड स्वरूपाचे असून पाच वर्षांच्या कालावधीचे आहेत. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. या अभ्यासक्रमांना आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणारी  जेईई-मेन आणि जेईई- अॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्स, आयआयटी, रुरकी, उत्तराखंड. ईमेल-ीं१३ँ@्र३१.ूं.्रल्ल वेबसाइट- www.iitr.ac.in
* झेवियर कॉलेज ऑफ सायन्स :
> एम.एस्सी. इन जिऑलॉजी.  कालावधी – दोन वर्षे. अर्हता- भूगर्भशास्त्र या मुख्य विषयासही बी.एस्सी. पदवी. पत्ता- ५, महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१.
    वेबसाइट- www.xaviers.edu
> महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये बारावीनंतर जिऑलॉजी विषय घेऊन बी.एस्सी. करण्याची सोय आहे. त्यानंतर विद्यापीठांमध्ये एम.एस्सी. इन जिऑलॉजी हा अभ्यासक्रम
करता येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:01 am

Web Title: studying seismology
Next Stories
1 अणू तंत्रज्ञानातील संधी
2 ‘आयटीआय’चे औद्योगिक प्रशिक्षणक्रम
3 ‘आयटीआय’चे कौशल्य प्रशिक्षणक्रम
Just Now!
X