scorecardresearch

पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास

पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा आढावा..

पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा आढावा..
भारत हा ऐतिहासिकदृष्टय़ा समृद्ध वारसा असलेला प्रदेश आहे. देशात प्रागऐतिहासिक काळापासूनच्या ऐतिहासिक वास्तू, अवशेष, गडकिल्ले आदी विपुल प्रमाणात आढळतात. त्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक विकासाच्या उत्क्रांतीचा शोध आणि बोध घेता येतो. ऐतिहासिक वारशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यात पुरातत्त्वशास्त्र (आर्किऑलॉजी) या विषयातील तज्ज्ञांचा हातभार लागतो. नव्या ऐतिहासिक प्रदेशाचे उत्खनन, त्याचा अभ्यास, निष्कर्ष या बाबीही तज्ज्ञांना कराव्या लागतात. सॅटेलाइट इमेजिंग, जेनेटिक मॅपिंग, रेडिओकार्बन डेटिंग, थर्मोग्राफी, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग यांसारखी अत्याधुनिक यंत्रसामग्री या तज्ज्ञांच्या साहाय्याला सध्या उपलब्ध झाल्याने उत्तखननाची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
पुरातत्त्वशास्त्र हा आंतरज्ञानशाखीय विषय आहे. यामध्ये उत्खननासोबत प्राचीन मानवी संस्कृती, जीवनशैली यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी प्राचीन वास्तू, नाणी, विविध प्रकारच्या भांडय़ांचे अवशेष, शस्त्रे, दागिने, वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष, मानवी सांगाडे, कवटी व इतर मानवी अवयव, कागदपत्रे, चोपडय़ा, वास्तूशैली आदींचा सूक्ष्म अभ्यास आणि विश्लेषण करावे लागते.
अतिप्राचीन वारशांचे जतन आणि संरक्षण करण्याच्या जिकिरीच्या कामाची जबाबदारी या तज्ज्ञांना पार पाडावी लागते.
इतिहास विषय घेऊन करिअर होऊ शकते याविषयी साशंकता असल्याने पुरातत्त्वशास्त्र विषयाकडे जाणीवपूर्वक वळणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.
हा विषय घेऊन वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या जगात प्रवेश करता येतो. तथापि, यासाठी संयम, मानसिक संतुलन आणि अतिशय कष्ट करण्याची तयारी या गुणांची आवश्यकता आहे. उत्खनन ते सरंक्षण, संवर्धन या प्रवासात प्रत्येक टप्पा काटेकोरपणे निर्धारित वेळेत करून घेण्याचे कौशल्य या तज्ज्ञांना प्राप्त करावे लागते. इतिहासातील आपल्या लोकांची संस्कृती जाणून घेण्याची इच्छा आणि रस असणाऱ्यांसाठी हा विषय मोठे समाधान प्राप्त करून देऊ शकतो. या तज्ज्ञांना दिवसेंदिवस उत्खननाच्या कार्यात गढून जावे लागते. त्यानंतर प्रयोगशाळांमध्ये काम करावे लागते. यामध्ये काही महिने वा वष्रेही व्यतीत होऊ शकतात.

करिअर संधी :
सध्या भारतासह अनेक देशांत ऐतिहासिक परिसराचे उत्खनन सुरू आहे. प्राचीन वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षणाकडेही लक्ष पुरवले जात आहे. युनेस्को या संघटनेने जगातील अनेक वास्तूंना ऐतिहासिक वारशाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण, संवर्धन आणि नव्या संशोधनासाठीही निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे पुरात्वत्त्वशास्त्रज्ञांना करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.

भारतात आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया :
या शिखर संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. या संस्थेमार्फत साडेतीन ते चार हजार ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संरक्षण केले जाते. याशिवाय प्राचीन चोपडय़ा, कागदपत्रे, शिलालेख यांचे संरक्षण, विविध ठिकाणी असलेल्या वस्तुसंग्रहालयांचे संनियंत्रण या बाबींची जबाबदारी ही संस्था पार पाडत असते.
आर्किऑलॉजी सव्‍‌र्हे ऑफ इंडियाची कार्यालये देशभर आहेत. या कार्यालयांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते. या नियुक्त्या संघ लोकसेवा आयोग अथवा राज्य लोकसेवा आयोगामार्फत केल्या जातात. वरिष्ठ पदांच्या नियुक्तीसाठी या विषयात पीएच.डी. केली असल्यास लाभ होऊ शकतो.
* या तज्ज्ञांना विदेश मंत्रालय, कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, पर्यटन विभाग, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज, इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, नॅशनल अर्काइव्ह ऑफ इंडिया, काही परदेशी संस्था, विद्यापीठे या ठिकाणीही करिअर संधी मिळू शकतात.
* चित्रपट/ टीव्ही मालिका/ कार्यक्रमांमधील ऐतिहासिक प्रकल्पांशी संबंधित बाबींसाठी तज्ज्ञ म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.

काही खासगी वस्तुसंग्राहकांच्या ताब्यातील संग्रहालयाची देखभाल व संवर्धनाची जबाबदारीही मिळू शकते.

अभ्यासक्रम आणि संस्था :
देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. तो कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना करता येतो. तथापि, विद्यार्थ्यांने इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये पदवी घेतली असल्यास उत्तम. या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विशेष खर्च करावा लागत नाही.

इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किऑलॉजी :
आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किऑलॉजि या संस्थेमार्फत पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन आर्किऑलॉजि हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाला ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पदवी परीक्षेतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीतील विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. ही परीक्षा दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दिल्ली येथे घेतली जाते. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना जाण्यायेण्याचे दुसऱ्या श्रेणीचे रेल्वे अथवा बस भाडे दिले जाते. लेखी आणि मौखिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते. अर्हता- ५५ टक्के गुणांसह प्राचीन अथवा मध्ययुगीन भारतीय इतिहास, पुरातत्त्वशास्त्र किंवा मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र किंवा संस्कृती/ पाली/ अरेबिक किंवा पíशयन भाषा या विषयातील पदव्युत्तर पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये
५ टक्के सवलत देण्यात येते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑक्टोबर महिन्यात होतो.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. अध्यापन काळातील विविध अभ्यास दौऱ्यांचा खर्चही संस्थेमार्फतच केला जातो. दिल्लीबाहेरील उमेदवारांसाठी वसतिगृहाची सोय आहे.
संपर्क- डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ आíकऑलॉजी, आíकऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, लाल किल्ला,
दिल्ली- ११०००६.
संकेतस्थळ- asi.nic.in

नॅशनल म्युझियम इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट्स, कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड म्युझिऑलॉजी :
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* एम.ए. इन म्युझिओलॉजी (वस्तुसंग्रहालयशास्त्र).
* एम.ए. इन हिस्ट्री ऑफ आर्ट.
* एम.ए. इन आर्ट कन्झव्‍‌र्हेशन.
संपर्क- नॅशनल म्युझियम इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट्स, कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड म्युझिओलॉजी, जनपथ, नवी दिल्ली- ११००११. संकेतस्थळ- nmi.gov.in

दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ हेरिटेज रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट :
संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* मास्टर इन आíकऑलॉजी अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट.
* मास्टर इन कन्झव्‍‌र्हेशन, प्रीझव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी.
संपर्क- १८ ए, सत्संग विहार मार्ग, कुतूब इस्टिटय़ूशन एरिया, नवी दिल्ली- ११००६७. वेबसाइट- dihrm.delhigovt.nic.in
ई-मेल- dihrm/bol.net.in

 

– सुरेश वांदिले

मराठीतील सर्व way to success ( Way-to-success ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Archaeologists studying

ताज्या बातम्या