मार्केटिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधी यांची सविस्तर माहिती..

कोणत्याही कंपनीच्या आणि उद्योगाच्या विकासात मार्केटिंगचे महत्त्व अत्याधिक असते. मार्केटिंगमुळे लहान अथवा मोठय़ा उद्योगाची वित्तीय स्थिती उत्तम राहू शकते. भारताचा आíथक विकास गतिमानतेने होत असून त्यात मार्केटिंग क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजारपेठेतील सद्य प्रवाह आणि गती यांचा अभ्यास मार्केटिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. या अभ्यासातूनच त्याला कंपनीच्या वस्तूंची किंवा उत्पादनांची अधिकाधिक विक्री करण्यासाठी कोणती व्यूहनीती आखावी लागेल याचे वस्तुनिष्ठ आराखडे तयार करता येतात. त्यातून नावीन्यपूर्ण तंत्रकौशल्यसुद्धा विकसित होऊ शकतात. त्याचा लाभ विक्रीच्या वाढीस होऊ शकतो.

मार्केटिंग विषयाचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना प्रकल्प व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, बाजारपेठीय विश्लेषक आदी करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात येण्यासाठी मार्केटिंग विषयातील एमबीए ही पदव्युत्तर पदवी किंवा याच विषयातील एक अथवा दोन वष्रे कालावधीचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदविका प्राप्त असणे उपयुक्त ठरू शकते. बॅचरल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन मार्केटिंग मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमसुद्धा या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मार्केटिंग क्षेत्राव्यतिरिक्त ब्रँड मॅनेजमेंट, जाहिरात कम्युनिकेशन या क्षेत्रांतही करिअर करता येऊ शकते.

कोणत्याही कंपनीला अथवा उद्योगाला वित्तीय यश प्राप्त होण्यासाठी प्रतिभावंत मार्केटिंग व्यवस्थापकांची गरज भासते. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालेला उमेदवार स्वत:च्या परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर अल्पावधीत मार्केटिंग मॅनेजर अथवा प्रॉडक्ट मॅनेजर या पदापर्यंत पोहोचू शकतो.

एमबीए किंवा दोन वष्रे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयाचे पदवीधर अर्ज करू शकतात. बहुतेक सर्व व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमांना लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखत या तीन टप्प्यांद्वारे प्रवेश दिला जातो. नामवंत संस्थेतून एमबीए केलेल्या उमेदवारांना त्यांच्या मनाप्रमाणे कंपनीची अथवा उद्योगाची निवड करता येऊ शकते. काही उमेदवारांची निवड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर म्हणून होऊ शकते. अन्न प्रक्रिया उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये मार्केटिंग विषयातील मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. या कंपन्या उमेदवारांना उत्तम वेतन, भत्ते व इतर वित्तीय लाभ देतात. माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील व्यापाराचा वाढ व विस्तार हा मार्केटिंग तज्ज्ञांच्या साहाय्याने केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना करिअर संधी उपलब्ध होतात. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना सध्या मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्ह या मनुष्यबळाची गरज भासते आहे.

मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्हला ग्राहकांसोबत उत्तम संबंध निर्माण करणे आवश्यक ठरते. त्यामुळे मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केटिंग कम्युनिकेशन ही ज्ञानशाखा कला आणि शास्त्र या दोन्हींचा समन्वय साधणारी आहे. या विषयातील तज्ज्ञांना कंपनीच्या वस्तू आणि उत्पादन वाढीसोबत कंपनीचे सकारात्मक ब्रँिडगसुद्धा करावे लागते. त्यासाठी त्याला विविध माध्यमांचा प्रभावीरीत्या उपयोग करून माहितीची देवाणघेवाण करावी लागते. या क्षेत्रातील उमेदवाराला नवनव्या कल्पनांचा सातत्याने वापर करता येणे गरजेचे असते.

मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्रामुळे कंपनीच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी नवी व्यूहनीती अमलात आणणे शक्य झाले आहे. यामुळे कंपनीच्या अथवा उद्योगाच्या संपूर्ण उलाढालीवर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मार्केटिंग कम्युनिकेटरला निश्चित अशा ग्राहकांकडे प्रभावीपणे कंपनीच्या वस्तुनिष्ठ माहितीसह वस्तूंची अथवा उत्पादकांची विक्री वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतात. कंपनी आणि उत्पादकांबाबत जाणीवजागृती करणे, जुन्या ग्राहकांचा विश्वास कायम राखणे, नव्या आणि युवा ग्राहकवर्गाला आकर्षति करणे, ग्राहकांच्या मनात कंपनी व उत्पादकांबाबत विश्वास निर्माण करणे, कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवणे आणि त्यास अधिक सक्षम करणे या बाबींवर मार्केटिंग कम्युनिकेटरला लक्ष केंद्रित करावे लागते. नव्या वैश्विक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना काम करावे लागते.

हे क्षेत्र बहुज्ञानशाखीय असे झाले असून त्यामध्ये अर्थशास्त्र, वाणिज्य, समाजशास्त्रे, व्यवस्थापन आणि कम्युनिकेशन या विषयांचा समावेश होतो. जाहिरात, विक्री, विपणन, जनसंपर्क, थेट आणि व्यक्तिगत विक्री असे घटक यांत अंतर्भूत झाले असून त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या वस्तू आणि उत्पादनांना गतिमानतेने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाबींचा एकत्रितरीत्या वापर करण्याचे कौशल्य या क्षेत्रातील तज्ज्ञास प्राप्त करावे लागते. या सर्वाच्या प्रभावी एकत्रित वापरातूनच कंपनीच्या वित्तीय वृद्धीस हातभार लागत असल्याचे दिसून आले आहे.

इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सटिीचे अभ्यासक्रम

या विद्यापीठाने बारावीनंतरचे पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत : बॅचलर ऑफ व्होकेशन इन सॉफ्टेवअर डेव्हलपमेंट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन थिएटर, बॅचलर ऑफ व्होकेशन इन स्टेजक्राफ्ट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन फिल्म प्रॉडक्शन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.

या अभ्यासक्रमांना बारावीमधील गुणांवर प्रवेश दिला जातो. कालावधी- चार वष्रे.  संकेतस्थळ – www.igntu.ac.in

रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असून या संस्थेच्या टेक्निकल सíव्हसेस सेंटरने रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-

  • मास्टर सर्टििफकेट कोर्स इन अ‍ॅडव्हान्स्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. शुल्क- २४ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशिनग दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक.
  • मास्टर सर्टििफकेट कोर्स इन रेफ्रिजरेटर अ‍ॅण्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. फी- २१ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते.

अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयांतील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम.

  • सर्टििफकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- २ महिने. फी- ६ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम.
  • मास्टर सर्टििफकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- ४ महिने. फी- २१ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक. संपर्क- ओखला इन्डस्ट्रियल इस्टेट, फेज-३, न्यू दिल्ली- ११००२०.

संकेतस्थळ- www.nsic.co.in

ई-मेल- ntscok@nsic.co.in