पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानोबा माउली आणि तुकोबारायांची पालखी मंगळवारी शहरातून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या. दोन्ही पालख्यांचे हडपसर आणि परिसरातील नागरिकांनी भक्तिभावाने स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्यांच्या पायघडय़ा व फुलांच्या वर्षांवाने स्वागत करण्यात आले. नागरिकांनी मोठय़ा संख्येने पालख्यांचे दर्शन घेतले. विसाव्यानंतर तुकोबारायांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरातील मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.

तुकाराम महाराजांची पालखी सकाळी पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ होऊन सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर येथे पोहोचली. गाडीतळ परिसरात पालखीच्या स्वागतासाठी महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेता चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, बंडू गायकवाड, हेमलता मगर, नगरसेवक योगेश ससाणे उपस्थित होते.

हडपसर येथे पालख्यांचे आगमन होणार असल्याने भाविकांची पहाटेपासूनच लगबग दिसून येत होती. अनेक स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था केली होती. पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विसावास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. महापालिका प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तुकोबारायांची पालखी विसाव्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मार्गस्थ झाली.