वसई- सायबर भामट्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे नालासोपारा येथील एका १८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आईच्या मोबाईल मध्ये खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर भामट्याने २ लाख रुपये लंपास केले होते. यामुळे वडील रागावतील या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली.

नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील ओम जीडीएस कॉलनीत अविनाश रॉय (४०) हे पत्नी आणि गौरव (१८) भोला (१५) या दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा गौरव हा नालासोपारा मधील कुमारी विद्यामंदीर शालेत ११ वी इयत्तेत शिकत होता. सुट्टी लागल्याने त्याने आईचा मोबाईल गेम खेळण्यासाठी घेतला होता. बुधवारी त्याच्या मोबाईलवर एक लिंक आली. चुकून त्याने ती लिंक ओपन केली. मात्र ती फसवी लिंक सायबर भामट्यांनी पाठवली होती. लिंक ओपन केल्यामुळे सायबर भामट्यांनी गौरवचा मोबाईल हॅक केला. हा मोबाईल त्याच्या वडिलांच्या बॅंक खात्याशी लिंक होता. सायबर भामटयांनी मोबाईल हॅक करून त्यात असलेल्या वडिलांच्या बॅंक खात्यातील २ लाख रुपये लंपास केले. या प्रकारामुळे गौरव खूप घाबरला. त्याच्याकडून नकळत चुक घडली होती. वडिलांना ही गोष्ट समजल्यावर ते रागावतील, मारतील ही भीती त्याला वाटली. काय करू त्याला समजत नव्हते. त्यामुळे दुपारी ३ च्या सुमारास त्याने किटकनाषक प्राशन केले. काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागले.

हेही वाचा >>>राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप

शेजार्‍यांनी गौरवला उपचारासाठी वसईच्या एव्हरशाईन येथील आयकॉनीक मल्टिस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भात गौरवचे वडील अविनाश रॉय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही सांगण्याची मनस्थिती नसल्याचे सांगितले. सायबर भामट्याने मोबाईलवर लिंक पाठवून तो हॅक केला आणि त्याच्या वडिलांच्या खात्यातील २ लाख लंपास केले अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा पेल्हार पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो पुढील तपासासाठी पेल्हार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी योगेश मदने यांनी दिली.

मुलांशी संवाद साधण्याचे आवाहन

जो मोबाईल क्रमांक बॅंक खात्याशी लिंक असतो असे मोबाईल मुलांच्या हातात पालकांनी शक्यतो देऊ नये. तो देतांना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे. मुलांना बॅंकेचे पासवर्ड देऊ नये, फेस आयडी सारखे फिचर वापरून बॅंक खाती सुरक्षित ठेवावी असेही बजबळे यांनी सांगितले. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात २४ तासात तक्रार केली तर फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळतात. पंरतु हे या मुलाला माहित नव्हते अन्यथा त्याने टोकाचे पाऊल उचलले नसते.असेही ते म्हणाले.

मुले एकलकोंडी होत चालली आहे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना योग्य अयोग्य याची जाणीव करून दिली पाहिजे. यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती तसेच पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा  असे समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले.