वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे वर्सोवा पूल ते बापाणेपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या आठवडाभरापासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ  लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. ही कोंडी सोडविताना  वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत. वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या या  महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था आहे. विविध ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामार्गालगत झालेला माती भराव, अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.  मध्यंतरी साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरते मार्ग तयार केले होते. याशिवाय विविध ठिकाणी खडी व बारीक भुकटी मिश्रित साहित्य टाकून खड्डेही भरले होते. मात्र याचा काहीच फायदा झालेला नाही. सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू आहे. घराबाहेर पडल्यानंतर महामार्गावर पोहचताच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वर्सोवा पुलापासून ते मालजीपाडा, बापाणे फाटय़ापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग कमी होत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congestion on highways potholes even during festival season ysh