नागरिकांची गैरसोय;  पालिकेच्या दुर्लक्षामुळे समस्या जटिल

वसई : विरारजवळील वैतरणा – फणसपाडा परिसरातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. पालिकेने या भागातील पाणी समस्येकडे दुर्लक्ष केल्याने येथील समस्या अधिक जटिल बनली आहे. विरारजवळ  वैतरणा परिसर आहे. या भागातील विविध गाव-पाडे हे वसई-विरार महापालिकेच्या अखत्यारीत येतात. परंतु पालिकेचे या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन नसल्याने येथील भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या पूर्वी  पावसाचे दिवस असल्याने फणसपाडा येथील काही विहरी व बोअरवेलला थोडय़ाफार प्रमाणात असलेले पाणी हे वापरासाठी मिळत होते. मात्र आता उन्हाळ्याचे दिवस आल्याने त्याचे पाणी ही खारे झाले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर दुसरीकडे कण्हेर ते वैतरणा या मुख्य जलवाहिनीला २४ तास पाणी उपलब्ध असते, मात्र अस असतानाही नागरिकांपर्यंत ते पाणी का पोहोचत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे वैतरणा दहिसर गावात जलवाहिनी ही मागील एक वर्षांपासून अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली आहे त्यामुळे त्यातून पाणी गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया जाते. तेच पाणी रस्त्यावर येऊन साचत असल्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. अशा चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. याबाबत संबंधित विभागाला वारंवार कळवूनही दुरुस्ती केली जात नाही. पालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पालिकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुख्य जलवाहिनीची योग्य प्रकारे निगा राखून दुरुस्ती केल्यास फणसपाडा येथे असलेल्या टाकीत पाणी पोहोचू शकेल. आणि त्याच टाकीतून दोन ते तीन गावांना पाणीपुरवठा केला जाऊ शकेल. यासाठी पालिकेने नियोजन केले पाहिजे अशी मागणी आहे.

सतीश गावड, उपाध्यक्ष, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था