वसई- नालासोपार्‍यात २२ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी बचावली असून आचोळे पोलिसांनी फरार झालेल्या हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.मंगळवारी सकाळी हेमांगी सुरती (२२) ही तरुणी नालासोपारा पूर्वेच्या फुल बाजाराजवळून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. यावेळी विकास वर्मा (२३) नावाच्या तरुणाने तिला रस्त्यात अडवले. माझ्याशी बोलत का नाही? प्रेमसंबंध का ठेवत नाही? असे बोलून तिच्या पोटावर आणि छातीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर तरुण पसार झाला होता. नागरिाकंनी तरुणीला नालासोपारा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्लेखोर तरुण विकास वर्मा याला अटक केली आहे. आरोपी विकास हा बेरोजगार आहे. मात्र पीडित तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. त्यामुले तो तिच्या मागे लागला होता. त्या रागातून त्याने हा हल्ला केल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील यांनी दिली. आरोपी वर्मा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जखमी तरुणीला बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knife attack on young woman on road in nalasopara amy
First published on: 24-01-2024 at 22:15 IST