scorecardresearch

पालिकेच्या परिवहन सेवेला कंत्राटदार मिळेना

गेल्या वर्षभरात दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला कंत्राटदार मिळत नाही.

भाईंदर : गेल्या वर्षभरात दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला कंत्राटदार मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात परिवहन सेवा चालवण्यास दिलेल्या कंत्राटदाराच्या आर्थिक फायद्याकरिता निविदा प्रक्रियेत आवश्यक अटी-शर्ती टाकण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येते. हे कंत्राट भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला १ ऑगस्ट २०१९ देण्यात आले होते. मात्र प्रशासन आणि परिवहन कंत्राटदार यात वादास सुरुवात झाल्याने २०२० डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पालिका प्रशासनाने हे कंत्राट रद्द केले होते. त्यानंतर  दोन आठवडे कंत्राटदाराचेच कर्मचारी हाताशी घेऊन पालिका प्रशासनाने बस गाडय़ा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि अपुरा वेळ यामुळे ही सेवा सुरू ठेवणे पालिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे  परिवहन सेवा सुरू ठेवण्याकरिता परिवहन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मागील अटी-शर्तीनुसार खासगी कंत्राटदाराच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात परिवहन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महालक्ष्मी कंत्राटदाराच्या मदतीने सुरू ठेवण्यात आली आहे.

 गेल्या वर्षभरात दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यातील जानेवारीतील पहिली निविदा तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने रद्द करण्यात आली.   त्यानंतर महासभेत परिवहन धोरण निश्चित करून ३१ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मात्र कमीत कमी तीन कंत्राटदार मिळाल्याशिवाय निविदा उघडणे बंधनकारक असल्याने ती रद्द केली गेली. आता फेरनिविदा काढण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे प्रमुख दिनेश कानगुडे यांनी दिली. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या आर्थिक फायद्यासाठीच निविदेत अटी-शर्तीचा बदल करून वेळ काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप पालिकेतील काँग्रेस आणि शिवसेना या विरोधी पक्षांनी केले आहेत.

कंत्राटदार न मिळण्याची कारणे

मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा चालविण्याकरिता प्रशासनामार्फत निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र ही निविदा एनसीसी ( नेस्ट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) पद्धतीने काढण्यात आली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र फार छोटे आहे. त्यामुळे अशा पद्धतीने परिवहन सेवा सुरू ठेवणे कोणत्याच कंत्राटदाराला शक्य होणार नाही. त्यामुळे यात बदल केल्यानंतरच कंत्राटदार मिळणार असल्याची माहिती परिवहन सेवेच्या काही अभ्यासकांकडून मिळाली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal transport service contractor transportation service ysh

ताज्या बातम्या