सनसिटीत सर्वधर्मीय दफनभूमीसाठी पालिकेकडून निविदा

वसई : गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या वसईच्या सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. पालिकेने या दफनभूमीच्या कामाच्या निविदा काढल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

शहरातील मुस्लीम, ख्रिश्चनांसह इतर धर्मीयांसाठी दफनभूमी नव्हती. त्यामुळे समाजाची मोठी गैरसोय होत होती. त्यासाठी वसई-विरार महापालिकेने सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी बनविण्याची योजना तयार केली होती. त्यासाठी वसईच्या सनसिटी येथे ११ एकर जागा आरक्षित केली होती. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा पालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने २०१३ मध्ये या जागेवर माती भराव करून भिंत बांधली होती. मात्र या दफनभूमीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला होता.

दरम्यान, पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हरित लवादाने बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून या दफनभूमीचे काम रखडले होते. त्यानंतर पुन्हा पालिकेने या कामासाठी परवानगी मिळवण्याचे काम सुरू केले होते.

यात पालिकेला महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण आणि पाणथळ विभागाच्या परवानग्या मिळाल्या होत्या. मात्र तरीसुद्ध दफनभूमी तयार करण्याच्या कामाला विलंब होत होता. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी अधिक वाढल्या होत्या. दफनभूमी तयार करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांतर्फे आंदोलने करण्यात येत होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेकडे मागणी लावून धरली होती. नुकतीच या संदर्भात पालिकेत बैठक पार पडली होती.

या वेळी सर्वधर्मीय दफनभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने सुरक्षा भिंत व इतर कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. पुढील काही महिन्यांत ही सर्वधर्मीय दफनभूमी पूर्ण करणार असल्याचे आश्वाासन या बैठकीत शिष्टमंडळाला देण्यात आले.

सनसिटी येथे तयार करण्यात येणाऱ्या सर्वधर्मीय दफनभूमीची निविदा काढण्यात आली आहे. त्यात संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, त्या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. लवकरच ही कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

— राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

सर्वधर्मीय दफनभूमीचा प्रश्न व इतर नागरी समस्या याबाबत पालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार सुरूच आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दफनभूमीचा प्रश्न लवकरच सोडवू असे सांगितले आहे.

— समीर वर्तक, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग