आठवडय़ाची मुलाखत : शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए

श्रावणसरींसोबत चाहुल लागते ती सणवारांची. नागपंचमी, गोकु ळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी असे एकामागून एक सण येतात आणि सोबत  मिठाई व्यवसायालाही आर्थिक भरभराटीचे दिवस येतात. उत्सवकाळात वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही मंडळी अन्नपदार्थ, मिठाई, फराळाच्या जिन्नसासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळ करतात आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. त्यामुळे अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अन्नपदार्थ आणि औषध प्रशासन (एफडीए) सक्रिय होते. यंदाही सणासुदीच्या तोंडावर ‘एफडीए’ची काय कारवाई सुरू आहे, याविषयी ‘एफडीए’चे साहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई (अन्न) शशिकांत के करे यांच्याशी साधलेला संवाद.

  • सणासुदीच्या काळात अन्नभेसळीचे प्रकार वाढतात याची नेमकी कारणे काय?

सणासुदीच्या काळात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा-मावा, तेल-तूप, मैदा, बेसन, रवा अशा पदार्थांना खूप मागणी वाढते. ही मागणी पूर्ण करणे उत्पादकांना अनेकदा अशक्य होते. अशावेळी अन्नपदार्थांचा दर्जा राखला जात नाही असे दिसून येते. त्यामुळे अन्नपदार्थ अप्रमाणित आढळतात. पण मागील काही वर्षांंत अन्नपदार्थामध्ये जशी भेसळ होत होती तशी भेसळ आज दिसून येत नाही. आता अन्नपदार्थांचा दर्जा कमी जास्त होताना दिसतो. त्यातही सणासुदीच्या काळात असे प्रकार होताना दिसतात. याचे कारण एकच सणासुदीला काही विशिष्ट अन्नपदार्थांची वाढती मागणी आणि अनेकदा ती पूर्ण होत नसल्याने कमी दर्जाचे अन्नपदार्थ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताना दिसतात.

  • ही अन्नभेसळ रोखण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. ही मोहीम नेमकी कशी असते?

गणेशोत्सव ते नववर्ष यादरम्यान एका मागोमाग येणाऱ्या प्रत्येक सणाला गोड आणि फराळाच्या अन्नपदार्थांची मागणी वाढते. काही समाजकंटक याचा फायदा घेतात आणि अन्नपदार्थामध्ये भेसळ करतात. असे प्रकार रोखण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत गणेशोत्सव ते नववर्षांदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्यांचे पथक उत्पादक, वितरक, विक्रेते यांच्यावर नजर ठेवतात. गोदाम, दुकाने यांची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेतले जातात आणि ते तपासणीसाठी पाठवतात. नमुन्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अशी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

  • भेसळ करणाऱ्याविरोधात काय कारवाई केली जाते?

अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार भेसळखोर वा कमी दर्जाची, असुरक्षित अन्नपदार्थाचे उत्पादन, वितरण आणि विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई केली जाते. अप्रमाणित, खाण्याजोगे नसलेले आणि आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ विक्री केल्याचे तपासणी-चौकशीत स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात खटला दाखल केला जातो. यात भेसळखोर, संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात शिक्षा आणि दंड अशी कारवाई केली जाते. तर कमी दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात एफडीएच्या न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे खटला चालतो. यात दोषी आढळणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई होते. अन्नपदार्थांच्या पाकिटावर, डब्यावर लावल्या जाणाऱ्या लेबलवरील माहिती योग्य नसेल, त्यात काही त्रुटी असतील तर एक नोटीस देऊन त्यांना आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना केल्या जातात. १५ दिवसांत हे बदल न झाल्यास पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते.

  • कारवाई वाढूनही हे प्रकार सुरूच आहेत..

अन्नभेसळ करणाऱ्याविरोधात एफडीएकडून सातत्याने कारवाई करण्यात आली येते. अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात, कमी दर्जाचे अन्नपदार्थ विकणाऱ्या आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. काळानुसार कायद्यात अनेक बदल करून कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे निश्चितच अन्नभेसळीचे प्रमाण राज्यात कमी झाले आहे. अन्नभेसळ आणि कमी दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री काही प्रमाणात होत असून आम्ही त्याविरोधात नियमित कारवाई करत आहोत.

  • सणासुदीच्या काळात कोणकोणत्या अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होते?

सण म्हटले की सर्वात आधी येतात ते म्हणजे गोड पदार्थ. मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मग त्यानंतर तेला-तुपातील तिखट-गोड पदार्थ, चॉकलेट, केक अशा पदार्थांना विशेष मागणी असते. त्यामुळे सणासुदीला दूध, खवा-मावा, मिठाई, चॉकलेट, केक, तेल-तूप, रवा, मैदा, बेसन, डाळी यामध्ये सर्वाधिक भेसळ दिसून येते. या सर्व अन्नपदार्थांच्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर आम्ही गणेशोत्सव ते नववर्ष यादरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत करडी नजर ठेवून कारवाई करतो.

  • घरच्या घरी अन्नभेसळ कशी ओळखावी?

घरच्या घरी कुठली भेसळ वा अन्नपदार्थांचा दर्जा ओळखणे अशक्य आहे.  मिठाईसाठी वापरण्यात येणाऱ्या रंग खाण्याचा आहे की त्यात भेसळ आहे हे ओळखणे अगदी सोपे असते. आयोडीनचे दोन थेंब मिठाईवर टाकल्यानंतर तिचा रंग निळा झाल्यास त्यात भेसळ असल्याचे स्पष्ट होते. पण घरी अन्नपदार्थामधील भेसळ ओळखता येत नाही. त्यासाठी प्रयोगशाळेचीच गरज आहे. असे असले तरी ग्राहकांनी फक्त कोणत्याही अन्नपदार्थांची खरेदी करताना सजग राहणे आवश्यक आहे. मिठाई ताजी आहे की नाही हे वास, चव पाहून तपासून घ्यावे. इतर अन्नपदार्थही तपासून खरेदी करावीत.

  • नागरिकांना काय आवाहन कराल?

सण उत्साहात, आनंदात साजरे व्हायला हवेत तसे ते सुरक्षितही असायला हवेत. म्हणजेच सणाच्या दिवशी सुरक्षित अन्नपदार्थांचे सेवन करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे एफडीए नोंदणीकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी. खरेदी के ल्यानंतर त्याचे बिल घ्यावे, बिलाचा आग्रह धरावा, अन्नपदार्थ चव आणि वास या बाबी तपासून खरेदी कराव्या. मिठाई आणि इतर पदार्थ कधी खावे याबाबतही नियम आहेत. या नियमांचेही पालन करावे. महत्त्वाचे म्हणजे कुठलीही शंका असल्यास, भेसळ आढळल्यास आणि भेसळखोरांबाबत काही माहिती असल्यास त्वरित एफडीएशी संपर्क साधावा.

– मुलाखत : मंगल हनवते