वसई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या ‘सिरीयल रेपिस्ट’ ला गुन्हे शाखा २ च्या पथकाने गुजरात येथून अटक केली आहे. बागपत मारवाडी (२८) असे या विकृत आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याने एकूण दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार शहरात सिरीयल रेपिस्टची दहशत पसरली होती. हे विकृत अल्पवयीन शाळकरी मुलींना बळजबरीने आडोशाला घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एका विकृत आरोपीला गुन्हे शाखा ३ पथकाने वाराणसी येथून अटक केली होती. मात्र दुसरा आरोपी फरार होता. दरम्यान, या फरार असलेल्या आरोपीने मंगळवारी नालासोपारा येथील आठ वर्षे चिमुकल्या मुलीला गच्चीवर नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो इमारतीतून बाहेर जाताना दिसून आला होता.

२५० फोन आणि अडीच हजार नंबर्सचा शोध

या विकृत आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा २ च्या पथकाने विशेष मोहिम हाती घेतली होती. या परिसरातील २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले होते. या कृत्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन बंद ठेवला होता. मात्र पोलिसांनी परिसरातील मोबाईल टॉवरचा डंप डेटा (त्या वेळी परिसरात करण्यात आलेले फोन) काढला. त्यावेळी अडीच हजारांहून अधिक कॉल्स करण्यात आले होते. या सर्व मोबाईल क्रमांकाचे वर्गीकरण करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. घटनेनंतर आरोपी हा कल्याण येथे गेला होता.

हेही वाचा : वसई भाईंदर रो रो सेवेला गाळाचा अडथळा, पुढील आठवड्यात प्रायोगिक सेवा होणार सुरू

पोलिसांचे पथक कल्याण येथे पोहोचले पण तोपर्यंत आरोपीने राजस्थानला जाण्यासाठी अजमेर एक्स्प्रेस रेल्वे पकडली होती. पोलिसांनी सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेला संपर्क साधून सुरत येथून त्याला अटक केली. अस्पष्ट सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे, सागर प्रकाश शिंदे आदींच्या पथकाने या विकृताला बेडया ठोकल्या.

हेही वाचा : न्यायालयाच्या निकालापूर्वीच अधिसूचना, २९ गावे वसई विरार महापालिकेत समाविष्ट

आरोपी बागपत मारवाडी हा बेरोजगार असून नालासोपारा येथे राहतो. यापूर्वी त्याने नालासोपारा येथील तुळींज आणि आचोळे परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पुढील तपासासाठी त्याला आचोळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीने आणखी मुलींवर अशाप्रकारे लैगिंक अत्याचार केला आहे का त्याचा पोलीस तपास करत आहेत.