वसई- ‘लोकशाही टिकवा, मतदान करा’ असा संदेश देत आता वासुदेव वसई विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी वसई विरार महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.

वासुदेव आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असं लोभसवाणं रुप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत-गावात सकाळी फिरत असतो. वंशपरंपरागत हा भिक्षुकीचा व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच एका वासुदेवाचे दर्शन सध्या वसई विरार परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते गात असे. वसईत दिसणारा हा वासुदेव मात्र लोकशाहीचा जागर करतोय. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहेत.

हेही वाचा – वसई: पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण, पोलिसाचा तुटला दात

वसई विरार महापालिकेतर्फे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (एसव्हीईईपी) सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वासुदेवाच्या रुपात नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. पायवाट प्रॉडक्शनतर्फे हा वासुदेवाच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. हा वासुदेव ठिकठिकाणी फिरून लोकांना मतदानाचे महत्व पटवून देत आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. एक मत देशाचे भवितव्य ठरविणार आहे. ते मत वाया घालवू नका, २० मे रोजी मतदान करण्यासाठी केंद्रावर नक्की या असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे. शहरातील चौक, गर्दीची ठिकाणे येथे हा वासुदेव लोकगीतातून लोकांना मतदानाचे आवाहन करत आहे.

हेही वाचा – अखेर वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद, २५ दिवसानंतर वनविभागाला यश

महाराष्ट्राच्या संस्कृती आणि पंरपरेत वासुदेवाचे स्थान आहे. त्याची वेशभूषा आणि मधाळ वाणी आजही लोकांना आकर्षित करते. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वासुदेवाचा आधार घेण्यात आला आहे. त्याला बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. वासुदेवाच्या या आवाहनामुळे लोकं मतदानासाठी मोठ्या उत्साहाने बाहेर पडतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील असा विश्वास पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर यांनी व्यक्त केला.