News Flash

उद्यानवाट : कुंडीत झाडे लावण्याच्या पद्धती

मागील लेखात आपण कुंडीत झाडे कशी लावावीत व ती लावताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेतली.

मागील लेखात आपण कुंडीत झाडे कशी लावावीत व ती लावताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेतली. कुंडीत झाड लावताना कधी कधी असे होते की, नर्सरीमधून आणलेल्या झाडाची पिशवी मोठी असते, त्यामुळे झाडाची हुंडी मोठी असते. ती तशीच्या तशी कुंडीत जर नाही राहिली तर हुंडीची खालच्या भागातील व बाजूची माती अलगदपणे काढून हुंडीची उंची व हुंडीचा आकार कमी करता येतो. त्यामुळे ती आपण ठरवलेल्या आकाराच्या कुंडीत नीट राहू शकते. पण अशा प्रकारे हुंडीची माती कमी करून जेव्हा झाड लावले जाते तेव्हा थोडी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या प्रक्रियेमध्ये मुळे तुटतात व त्याच्या झाडाच्या वाढीवर परिणाम होऊ  शकतो. तसेच लावलेले झाड नाजूक प्रकारातले असेल तर त्याला आधार द्यावा.

कुंडीतील लागवड केलेले झाड २ ते ३ दिवस सावलीत ठेवल्यानंतर त्याच्या ठरवलेल्या जागी ठेवावे. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे नवीन लावलेली झाडे transplanting shock घेतात व त्यांना कुंडीतील वातावरणाशी जुळवून घ्यायला २ ते ३ दिवस किंवा कधी कधी आठवडादेखील लागू शकतो. कुंडीच्या खाली प्लेट ठेवावी. पहिले २ दिवस दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घालावे. नंतर दिवसातून एकदा किंवा २-३ दिवसांतून एकदापण पुरते. पण हे ठरवण्यासाठी खालील मुद्दय़ांचा विचार करावा.

कुंडीतील झाडांना पाणी घालताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे, या झाडांच्या मुळांभोवती मर्यादित प्रमाणात माती असते. शिवाय जमिनीतल्या झाडांसारखी जास्तीच्या पाण्याची जमिनीत झिरपायची सोय नसते. कुंडीतील झाडाला जेवढे पाणी आपण घालतो तेवढे पाणी कदाचित जमिनीतल्या झाडाला कमी पडू शकते, कारण जमिनीच्या प्रकारानुसार पाणी जास्त खोलवर तसेच आडवेही पसरते. मात्र कुंडीतील झाडांच्या बाबतीत कुंडीतील मातीतून पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाणही फार कमी असते, कारण ती जास्त काळ सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात असतात. त्यामुळे घातलेले पाणी बराच काळ कुंडीतल्या मातीतच राहते. या सर्व कारणांमुळेच कुंडीतील झाडांना जास्त पाणी घालू नये. एकवेळ पाणी थोडं कमी पडलं तरी चालेल, पण कुंडीतील परिस्थितीत जास्त पाण्यामुळे कुंडीतील झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ  शकतो. परंतु योग्य प्रमाणात पाणी देणेही आवश्यक असते; पाण्याचे प्रमाण खूप कमी होत नाही ना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी खूप कमी झाले तर झाड निस्तेज वाटू शकते. त्यामुळे निरीक्षण करून पाण्याचे प्रमाण ठरवावे.

अशा प्रकारे निरीक्षणावर आधारित पाण्याचे प्रमाण प्रत्येकाने ठरवले तर झाडांच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितच बघायला मिळेल.

कुंडीतील झाडांना पाणी घालताना..

*     जर झाड पूर्ण सावलीत असेल तर एक दिवसाआड आवश्यकतेनुसार पाणी देऊन चालते.

*     झाडांना दिवसातून काही तास सूर्यप्रकाश मिळत असेल तर एक दिवसाआड किंवा रोज थोडे पाणी घालावे. पण हे निरीक्षणावरून ठरवावे. कुंडीतील मातीला हात लावल्यावर किंवा मातीच्या रंगावरून जर ओलसरपणा जाणवत असेल तर त्या दिवशी पाणी घालू नये.

*     झाडाच्या प्रकारानुसारही पाणी किती द्यावे हे ठरते. जर निवडुंगाच्या प्रकारातील झाडे (Cacti and Succulents) लावली असतील तर मुळातच त्यांची पाण्याची गरज खूप कमी असते. त्यामुळे अशा झाडांना ४-५ दिवसांतून एकदा थोडे पाणी घालावे. तसेच अशी झाडे सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावी.

*     पाण्याचे प्रमाण- पाण्याचे प्रमाण हे झाडाचा प्रकार, झाडाचे आकारमान / वाढ- पानांचा आकार, पानांची संख्या व झाडाचा विस्तार, कुंडीचा आकार, सूर्यप्रकाश / सावलीचे झाडाला मिळणारे प्रमाण या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे एखादे झाड कुंडीत लावताना लहान असेल तर सुरुवातीच्या काळात लागणारे पाणी व काही महिन्यांनंतर त्या झाडाची वाढ झाल्यावर त्याला लागणारे पाणी याच्या प्रमाणातही फरक असू शकतो. या सर्व गोष्टी निरीक्षणावर आधारित अभ्यासातून होऊ  शकतात. आपली झाडांविषयी असलेली आवड आपल्याला अशी निरीक्षणे व अभ्यास करण्यास प्रेरित करतात.

जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:30 am

Web Title: how to grow tree in pot
Next Stories
1 घर सजवताना : बाथरूम
2 फर्निचर : टीव्ही युनिट
3 बांधकामाची स्ट्रक्चरल डायरी सक्तीची हवी
Just Now!
X