03 March 2021

News Flash

उपराळकर पंचविशी : स्मार्ट की आदर्श शहर ? ‘स्मार्ट शहरा’तील वास्तव!

‘शिवाजी नगर’ परिसरातील सुमारे ३३३ एकर जागेवरील ३००० कोटींची नवीन शहर योजना मंजूर केली.

निसर्गसुंदर आणि सणासुदीने नटलेला श्रावण अनुभवत, जुन्या आणि नव्या भोपाळ शहर परिसराचं तपशीलवार सर्वेक्षण करण्यात वास्तुपुरुष गेला पंधरवडाभर गुंगला होता. पण अचानक सुरू झालेल्या मघा नक्षत्राच्या ‘कोसळणाऱ्या जलधारां’नी केवळ भोपाळच नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेशालाच ‘ओलंचिंब’ तर करून टाकलंच, पण प्रमुख शहरांना ‘बुडवून’ अस्ताव्यस्तही करून टाकलं. तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध भोपाळचे अनेक परिसर जलमय होऊन गेले, इतर अनेक शहरं तर ‘तलावमय’ होऊन गेली आणि शहरांतील विस्कळीत जीवन होडय़ांच्या साहाय्याने वाहतूक करून पुन्हा मार्गस्थ करायला लागलं. भोपाळ हे मध्य प्रदेश या राज्याच्या राजधानीचं शहर. सरकारी ‘स्मार्ट’ शहर योजनेच्या प्रकल्पातील प्रमुख शहर. अनियोजित शहरांची काही क्षणांत कशी वाताहत होऊ शकते आणि आता ‘स्मार्ट’ बनताना काय करायला पहिजे याचा धडाच जणू काही निसर्गाने भोपाळवासीयांना दिला. खरं तर अशा अनेक धडय़ांतून सर्वच शहरांना आदर्श नियोजनाचा मार्ग कळू शकतो, पण शिकायची व सुधारायची तयारी हवी ना! हताश अवस्थेत वास्तुपुरुषाने एक दीर्घ उसासा टाकला, तोच समोरच्या पुरातन हवेलीच्या घुमटामागील कृष्णमेघांतून वीज कडाडली. पाठोपाठ आला उपराळकर देवचाराचा धीरगंभीर आवाज- ‘‘काय वास्तुपुरुषा, मघा नक्षत्राच्या एका धुवाधार पावसाने तुला इतकं निराश करून टाकलं? तू तर आज मला ‘स्मार्ट भोपाळ’ शहराची संकल्पना सांगणार होतास.’’
‘‘अनेक दंडवत, देवा महाराजा! कसा वेळेवर उगवलास मला ‘जागवायला’! देवचारा ही निराशा नाही, पण अस्वस्थता जरूर आहे. आणि ती फक्त या अलीकडच्या मुसळधार पावसामुळे झालेली दुर्दशा बघून आलेली नाही, तर त्या आधीपासूनच इथल्या जनतेत सरकारच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पामुळे उफाळून आलेली उद्विग्नता अनुभवल्यामुळे आलेली आहे. या वर्षांच्या सुरुवातीला राज्य सरकारने ‘स्मार्ट’शहर प्रकल्पांतर्गत ‘शिवाजी नगर’ परिसरातील सुमारे ३३३ एकर जागेवरील ३००० कोटींची नवीन शहर योजना मंजूर केली. हे जाहीर होताच सर्वत्र जनतेचा रोष उफाळून आला. अनेक कारणांनी असलेल्या विरोधामुळे आंदोलनं सुरू झाली, असंतोषाच्या घोषणांनी भिंती रंगून गेल्या, महानगरपालिकेत आणि विधानसभेत सरकार आणि विरोधकांत तुंबळ द्वंद्वं लढली गेली. या प्रचंड असंतोषाची दखल घेऊन शेवटी मुख्यमंत्र्यांनी ‘शिवाजी नगर’ योजना रद्द करून ‘स्मार्ट’ प्रकल्प ‘उत्तर तात्या टोपे नगर’ इथल्या सुमारे ७०० एकर जागेत हलवण्याचा निर्णय जाहीर करून तात्पुरती शांतता निर्माण केली. माझ्या अस्वस्थतेचं कारण हे आहे की माझ्या मते, ही केवळ ‘वादळापूर्वीची शांतता’ आहे. मी गेला पंधरवडाभर जुन्या आणि नवीन भोपाळ परिसरात भटकताना स्थानिक जनतेच्या या विषयावरील विचारांची चाचपणी करत होतो. लोकांना सुधारणा आणि विकास नक्कीच हवा आहे. त्यासंबंधी त्यांचे, विस्कळीत का असेनात, पण स्वानुभवातून आलेले सुजाण विचार आहेत. मुख्य अडचण ही आहे की आज ‘स्मार्ट भोपाळ’ प्रकल्पांचं नियोजन करताना स्थनिक जनतेला परिपूर्ण भरतीने विश्वासात घेतलंच गेलेलं नाही. सरकारातले ‘लोकप्रतिनिधी’, सरकारी अधिकारी, बाहेरील सल्लागार आणि प्रकल्प-विकासक यांच्या एकत्रित ‘संगनमता’ने नियोजित केलेले, ‘चकाचक’ सादरीकरणातून जाहीर होणारे हे प्रकल्प स्थानिक जनतेला अविश्वासनीय वाटणारच. कोणत्याही विकास प्रकल्पाचं महत्त्वाचं अंग असलं पाहिजे ‘लोकसहभाग.’ इथे हेच टाळलं जात आहे आणि तेच मला अस्वस्थ करून टाकत आहे.’’
उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला, ‘‘वास्तुपुरुषा, तुझी आणि त्यातूनच स्थानिक जनतेची व्यक्त होणारी उद्विग्नता मी समजू शकतो. पण आपल्याला यातून मार्ग काढायला हवा, तो लोकांना सुचवायला हवा. आणि तुझ्याशिवाय कोण योग्य आहे हे मार्गदर्शन करायला? सर्वप्रथम हे ‘स्मार्ट शहर’ प्रकरण मला जरा समजावून देशील का?’’
देवचाराच्या या हळुवार समजावणीने वास्तुपुरुष बराच सावरला. आपल्या विचारांना शिस्तबद्ध करत त्याने सुरुवात केली, ‘‘सर्वप्रथम मला ‘स्मार्ट’ हा शब्दवापरच इथे योग्य वाटत नाही. तो अगदी उथळ, चलाखीने वापरलेला आणि केवळ तंत्रज्ञानाचं बोट धरून पळवाट शोधणारा वाटतो. मला आपली शहरं व खेडी ‘आदर्श’ व्हायला हवीत, सर्वच बाबतीत. माझ्या दृष्टीसमोरील भारतातील ‘आदर्श शहरं’ ही ‘आदर्श खेडय़ां’च्या साहाय्याने उभी असतील. मी विकेंद्रीकरणाचा पुरस्कर्ता आहे. ‘शहर क्षमते’वर भर देऊन, केवळ महानगरांच्या महाकाय विकासाऐवजी विकेंद्रित छोटय़ा शहरांचा व खेडय़ांचा विकास मी पुरस्कृत करेन. शहरासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या (शुद्ध हवा, पाणी, ऊर्जा) उपलब्धतेवर आधारित शहरी क्षमता ठरवायला हवी आणि ती मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात किमान एक ‘आदर्श खेडं’ असावं, प्रत्येक जिल्ह्यत एक ‘आदर्श शहर’ असावं आणि प्रत्येक राज्यात एक ‘आदर्श महानगर’ असावं. हा ‘आदर्श’ विकास ‘निसर्ग-परिसंस्था, पर्यावरण, शाश्वतता व स्थानिक संस्कृती’ या सूत्राच्या भक्कम पायावर आधारित असेल. ‘Good Ecology is Good Economy’ हे या शाश्वत विकासाचं प्रमुख सूत्र असेल. या ‘आदर्श’ परिसरांना त्यांचं स्वत:चं खास व्यक्तिमत्त्व असेल, ते लोकसहभागातून उमललेलं असेल. माझ्या ‘आदर्श’ खेडय़ात, शहरात आणि महानगरातही, सुमारे ३३ टक्के क्षेत्र नसíगक परिसंस्थेसाठी (अरण्यं व वन्यजीव) असेल, ३३ टक्के क्षेत्र हरित परिसरासाठी (शेतं, उद्यानं, क्रीडांगणं, टेकडय़ा, नद्या, खाडय़ा, समुद्रकिनारे वगरे) असेल आणि ३४ टक्के क्षेत्र विकासासाठी (घरं, व्यापार, उद्योग, सामाजिक व शैक्षणिक संस्था, पायाभूत सुविधा वगरे) असेल. इथला विकासही आर्थिक, पर्यावरणीय व सामजिक शाश्वततेवर आधारित असेल. हा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरच होत राहील, तो सर्वसमावेशक असेल, लोकसहभागातून असेल. हा विकास र्सवकष असेल, संवेदनाक्षम असेल विशेषत: दुर्बल घटक (आर्थिक, सामाजिक व शारीरिक), स्त्रिया, मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना अनुकूल असेल. हा विकास ‘परिसर स्वयंपूर्ण’ असेल. इथे कोणत्याही मूलभूत साधन-सोयी बाहेरून येणार नाहीत व इथून कोणत्याही टाकाऊ गोष्टी बाहेर जाणार नाहीत. इथे लागणारं पाणी, ऊर्जा इथेच निर्माण केली जाईल आणि इथला कचरा, सांडपाणी इथेच प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येईल. इथल्या इमारती व सुविधा पर्यावरणस्नेही असतील, परिसर प्रदूषणरहित राखला जाईल. इथले उद्योग पर्यावरण नियमांच्या मर्यादेतच काम करतील. इथल्या नागरिकांना मूलभूत पर्यावरण व नागरिकशास्त्र याबाबतीतील लोकशिक्षणाच्या माध्यमातून संवेदनाक्षम केलं जाईल. नागरिक शिस्तीने व कायदापालन करून राहतील यावर प्रकर्षांने लक्ष ठेवण्यात येईल. इथलं प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानामुळे अतिकार्यक्षम असेल. या तंत्रज्ञानाचा उपयोग महसूल वसुली, सुविधा नियंत्रण, नियम पालन, भ्रष्टाचार निर्मूलन, नागरिकांसाठी सहजता व सुरक्षितता, आरोग्य सेवा इत्यादींसाठी केला जाईल. हा परिसर लोकसहभागातून आणि कार्यक्षम प्रशासन यांच्या मदतीने कायमच स्वच्छ व नागरिकस्नेही राखला जाईल. या मूलभूत गाभ्याभोवती ‘स्मार्ट शहर’ प्रकल्पातील घटक गुंफले जातील.’’
वास्तुपुरुषाची सुसाट विचारांची साखळी उपराळकर देवचाराने रोखली, ‘‘वास्तुपुरुषा, हे तुझं आदर्श शहराचं स्वप्न ठीक आहे, पण मला एक सांग की, सरकारी योजनेत यापेक्षा काय वेगळं आहे. लोकसहभागाचा एक भाग सोडला तर त्यांच्या संकल्पना काय आहेत?’’
‘‘देवा महाराजा, सरकारी संकल्पना कागदावर तशी उत्तम आहे. पण प्रश्न आहे नियोजनातील आणि नंतरच्या अंमलबजावणीतला. इथे मला शहरातील मूलभूत सुविधांच्या खाजगीकरणाचा तसंच बाजारीकरणाचा गंभीर धोका दिसतो. सरकारने मांडलेल्या संकल्पनेतलं ‘स्मार्ट शहर’ हे मुख्यत: आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणारं आहे, त्यातली कल्पनाचित्रं ही पाश्चिमात्य शहरांच्या प्रतिकृतीसारखीच दिसतात. या कर्कवृत्त प्रदेशात जर स्थानिक हवेल्यांशी स्पर्धा करायला आधुनिक चकमकणारे ‘शिश महाल’ उभे राहिले तर त्याला आपण ‘स्मार्ट’ विचार म्हणू का? सरकारी ‘स्मार्ट शहर’ संकल्पनेच्या ढोबळ आराखडय़ाची इमारत चार खांबी विकास सूत्रांवर आधारित आहे- संस्थात्मक, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक सुविधांची निर्मिती. मूलभूत सुविधांमध्ये काही प्रमुख घटकांचा अंतर्भाव कागदावर तरी आहे. आवश्यक पाणीपुरवठा, अखंडित वीजपुरवठा, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, उत्कृष्ट चलनवलन आणि सार्वजनिक वाहतूक, गरिबांसाठी परवडणारी घरं, आंतर्जालाची सर्वागीण उपलब्धता व संगणकीकरण, उत्कृष्ट व्यवस्थापन, लोकसहभाग, संतुलित पर्यावरण, नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षण. पण यापुढील तपशील मात्र सोडून दिलेला आहे. कशी करणार या घटकांची अंमलबजावणी हे अनुत्तरित आहे आणि स्थानिक जनतेला याबद्दलच अविश्वास आणि असुरक्षितता वाटत आहे. एक साधा प्रश्न सर्वाच्या मनात आहे की हे ‘स्मार्ट शहर’ फक्त श्रीमंतांनाच परवडणार, तिथला व्यवस्थापनाचा खर्चही अधिक असणार आणि त्याची वसुली खाजगीकरणामुळे सर्वावर लादली जाणार. म्हणजेच श्रीमंती ‘स्मार्ट’ शहराचा खर्च इतर ‘गावंढळ’ शहर भागातील गरीब जनतेकडून महसूल मार्गाने वसूल केला जाणार. लोकांना भीती आहे की हा त्यांना ‘त्यांच्या’ शहरातून हद्दपार करण्याचाच चोरमार्ग आहे.’’
‘‘वास्तुपुरुषा, माझ्यासमोर या ‘स्मार्ट शहरा’साठी अगदी साधे प्रश्न आहेत, रोजच्या जीवनात लोकांना भिडणारे. या शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाणार? इथला शुद्ध पाणीपुरवठा कुठून येणार? सांडपाण्याची विल्हेवाट कशी होणार? शहरी वाहतूक समस्या कशी सोडवणार? प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्येला काय पर्याय आहे? नागरी व्यवस्थापन कसं सुधारणार? भ्रष्टाचाराचं भूत कसं गाडणार? नागरिकांसाठी मोकळ्या जागा, क्रीडांगणं, हरित उद्यानं कुठे असणार? सांस्कृतिक वारसा कसा जपणार? पादचाऱ्यांसाठी आणि दुचाकींसाठी वेगळे रस्ते कसे निर्माण करणार? सार्वजनिक वाहतूक समाधानकारक आणि परवडणारी असणार का? इथली घरं सर्वसामान्यांना परवडणारी असणार का? इथे सर्व तरुणांना रोजगार मिळणार का? अनियंत्रित वाढ आणि बेकायदा बांधकामांना आळा कसा घालणार? मुख्य म्हणजे १९८४ सालसारख्या मानवनिर्मित किंवा इतर नैसर्गिक दुर्घटनांना सामोरं कसं जाणार? या आणि अशाच सर्वसामान्यांना जाचक प्रश्नांची उत्तर ‘स्मार्ट शहर’ प्रकल्पात आहेत का? करशील का थोडं स्पष्टीकरण?’’ देवचाराने वास्तुपुरुषाला ‘गुगली’ टाकला.
वास्तुपुरुष हसला, ‘‘देवचारा, या बहुतेक प्रश्नांची उत्तरं मी सुरुवातीला केलेल्या मांडणीत आहेत. शहराचा आवाका एकदा क्षमतेवरून निश्चित केला की समस्यांवरही नियंत्रण येतं. बहुतेक समस्यांचं उकलन प्रभावी व्यवस्थापनातून होऊ शकतं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, संगणकीकरणाचा, आंतर्जालाचा समर्पक वापर करावा लागेल. शहरांतला मुख्य प्रश्न असतो परवडणाऱ्या घरांचा आणि या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या झोपडपट्टय़ांचा. घर ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि व्यवस्थापनाने त्यावर नियंत्रण ठेवलं पहिजे. प्रत्येक कुटुंबाला फक्त एकच घर असा नियम केल्यास अनेक घरं गरजूंना सहज उपलब्ध होतील आणि घरांचा व्यापार थांबेल. आहे हे शक्य? देवा महाराजा, मी आशावादी आहे तसाच वास्तववादीही आहे. ‘स्मार्ट शहर’ प्रकल्प ही सुसंधी आहे. तिचं यथार्थ नियोजन आणि अंमलबजावणी करून या संधीला मूर्त स्वरूप नक्कीच देता येईल. प्रामाणिक आणि संवेदनाक्षम प्रयत्नांतूनच हे होऊ शकेल. ‘आदर्श’ खेडी, शहरं, महानगरं यांची निर्मिती स्थनिक जनतेला सुख, समाधान आणि सुरक्षितता देऊ शकेल. या आदर्श शहरांचा ‘समाधान व आनंद निर्देशांक’ सर्वोच्च राहील अशी माझी खात्री आहे, महाराजा.’’
उपराळकर देवचाराने समाधानाने स्मितहास्य केलं, ‘‘बघू या कशी होते या १०० ‘स्मार्ट’ शहरांची मांडणी. तुझे विचार पोचतीलच लोकांपर्यंत. आपण आता पुढे जाऊ या आणखी उत्तरेकडच्या परिसरात, उच्च अक्षांश आणि उच्च भूपातळीच्या प्रदेशात. तिथल्या घरांचा, इमारतींचा आणि शहरांचा आढावा घ्यायला. तुला आता हिमालयातच भ्रमंती करावी लागेल. तर मग भेटू आता भाद्रपदात, गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर.’’
‘‘होय महाराजा, १९८४ ची दुर्घटना मागे टाकून ‘आदर्श भोपाळ’ उभं राहील अशी आशा मलाही आहे. शिवाय या विचारांचा उपयोग इतर ‘स्मार्ट’ बनू पाहणाऱ्या शहरांनाही होऊ शकेल. निघेन मी आता उत्तुंग हिमालयाकडे, लवकरच येणारा पूर्वा नक्षत्राचा घनगंभीर पाऊस अंगावर घेत आणि मातृदिनी ‘भूमाते’कडे नतमस्तक होत.’’ वास्तुपुरुषाची नजर आता ‘तिसऱ्या ध्रुवा’च्या दिशेने वळली, तो स्वप्नमय झाला. पुन्हा एकदा विद्युल्लता नभांगण उजळून गेली आणि उपराळकरही त्या क्षणिक तेजात लुप्त झाला.
उल्हास राणे – ulhasrane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:30 am

Web Title: reality of smart city
Next Stories
1 ‘मोफा’ कायदा आणि पोलिसांचे परिपत्रक
2 ‘सीआरझेड’अंतर्गत विकास
3 माझे वास्तव्य : वाडा ते टॉवर..
Just Now!
X