मंगल कातकर

दिवाळीच्या मुहूर्तावर कुणी खास घर खरेदी करतं तर कुणी त्याची डागडुजी करतं. थोडक्यात काय, तर संपूर्ण घर व अंगण दिवाळीच्या स्पर्शाने न्हाऊन निघतं, तजेलदार होतं. दाराला तोरण लावलं जातं, रोशणाई केली जाते, आकाश कंदील लावले जातात. सुंदर रांगोळय़ानी दार सजवून पणत्यांनी सगळा परिसर उजळवला जातो.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य

‘लक्षदीप हे उजळले घरी
दारी शोभली कणा रांगोळी
फुलवाती अंगणात सोनसकाळी’

असं म्हणत दिवाळी कोजागिरीच्या टिपूर चांदण्यांचा आपल्या मनातला आनंद बाजूला सारत आपल्या घरी सोनपावलांनी प्रवेश करते आणि आपलं घर चैतन्याने, मांगल्याच्या प्रकाशाने उजळून काढते. ‘ दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा ’ असं उगीचं म्हणत नाहीत. वसुबारसपासून सुरू झालेली दिवाळी खऱ्या अर्थाने संपते ती तुलसीविवाहानंतर. एवढा मोठा कालपट कोणत्याही सणाचा नसतो. त्यामुळे दिवाळी आली की घरदार एका वेगळय़ाचं चैतन्याने, उत्साहाने सळसळायला लागतं.

जीवनातला अंध:कार दूर व्हावा, आपलं घर सकारात्मक आनंदाच्या प्रकाशात उजळून निघावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे संपूर्ण भारतभर दिवाळी हा सण मोठय़ा उत्साहात आपापल्या परंपरेनुसार व ऐपतीप्रमाणे लोक साजरा करत असतात. सण कोणताही असो तो थाटामाटात, आनंदोत्सवात साजरा करण्याची प्रत्येकाची हक्काची जागा म्हणजे घर. दिवाळी जवळ आली की लोक स्वत:ला सजवण्या आधी आपल्या घराला सजवतात. घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट या गोष्टी करून घराला सुंदर, सुशोभित बनवितात. दिवाळीच्या मुहूर्तावर कुणी खास घर खरेदी करतं तर कुणी त्याची डागडुजी करतं. थोडक्यात काय, तर संपूर्ण घर व अंगण दिवाळीच्या स्पर्शाने न्हाऊन निघतं, तजेलदार होतं. दाराला तोरण लावलं जातं, रोशणाई केली जाते, आकाश कंदील लावले जातात. सुंदर रांगोळय़ानी दार सजवून पणत्यांनी सगळा परिसर उजळवला जातो. ते लखलखते चंदेरी तेज सकारात्मक उर्जेने आसमंत भारावून टाकते. करंज्या, लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी कडबोळी, अशा अनेक पदार्थाचे खमंग वास घराघरांतून दरवळायला लागतो. मुंबईत चाळ संस्कृती जेव्हा मोठय़ा प्रमाणात होती तेव्हा स्त्रिया एकमेकींच्या घरी उत्साहाने फराळ करण्यासाठी मदत करायच्या.

आजही काही ठिकाणी हे ‘एकमेकां साहाय्य करू’चे धोरण दिवाळी फराळ बनवताना दिसते. ज्यांना फराळ बनवणं शक्य नाही ते विकत आणून फराळाची मजा लुटतात. दिवाळीत गोड-तिखट पदार्थाची रेलचेल असते. नवीन कपडे, वस्तू, दागदागिने इत्यादी खरेदी करून लोक आपला आनंद वाढवत असतात. प्रेमाने आपल्या नातलगांना, मित्रपरिवाराला घरी येण्याचं निमंत्रण देतात. एकमेकांना फराळ, मिठाई, भेटवस्तू इ. देऊन आपला व प्रियजणांचा आनंद द्विगुणीत करतात. दिवाळीत बौद्धिक खाद्य मिळावं म्हणून वाचनप्रेमी घरांमध्ये दिवाळी अंकाची खरेदी केली जाते व फराळाच्या आस्वादाबरोबर साहित्यिक आस्वाद घेतला जातो. बच्चे कंपनी घराच्या अंगणात, इमारतीच्या परिसरात मातीचे किल्ले बांधतात. यातून त्यांना दिवाळीच्या सुट्टीत विरंगुळा तर मिळतोचं, त्याशिवाय आपला इतिहास, परंपरा यांकडे सकारात्मकतेने पहाण्याचे बाळकडू मिळते.

पुराणातील कथांनुसार, दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम हे रावणाचा वध करून अयोध्येत परतले त्यावेळी अयोध्या नगरी दिव्यांनी उजळविण्यात आली होती. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय मिळवून देण्याची प्रेरणा देणारा दिवाळी सण थाटामाटात गावागावांत, शहरांमध्ये आपण आजही साजरा करतो. दिवाळीतल्या महत्त्वाच्या चार-पाच दिवसांत घरोघरी आनंदाला उधाण आलेले असते.

आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व शेतकरी कुटुंबाला जास्त असते. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानले जात असल्यामुळे या दिवशी गाय व वासराची पूजा केली जाते. आपल्याला दूध देऊन पोषण करणाऱ्या गायीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्त्रिया उपवास करतात. खास गोड नैवैद्य बनवून गायीला दाखवितात. जिथे गाय उपलब्ध नसते तिथे घरात पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटून पूजा केली जाते. या दिवशीपासून अंगणात रांगोळी काढून गृहिणी दिवाळी सणाची सुरुवात करते.

दुसरा दिवस असतो धनत्रयोदशीचा. या दिवशी घरातल्या धनाची म्हणजे दागदागिण्यांची पूजा केली जाते. नवीन कपडय़ांची व अलंकाराची खरेदी शुभ समजत असल्याने लोक याची खास खरेदी करतात. शेतकरी व कारागीर आपापल्या अवजारांची पूजा करतात. स्त्रिया धणे व गुळाचा नैवेद्य दाखवून घराच्या सुख-समृद्धीची कामना करतात. सगळीकडे पणत्या लावल्या जातात. वैदकीय क्षेत्रातले लोक धन्वंतरीची पूजा करून हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा करतात.

नरक चतुर्थीचा दिवस म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. सुवासिक तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान करण्यासाठी सगळं घर त्या दिवशी पहाटेचं उठतं. अंघोळ झाल्यानंतर दरवाजात रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात व नरकासुराचे प्रतिक म्हणून कारिटं डाव्या पायाच्या अंगठय़ाने फोडले जाते. देवाला अभ्यंगस्नान घालून दिवाळीला केलेला फराळ नैवद्य म्हणून दाखविला जातो व त्यानंतर घरातले सगळे छान गप्पागोष्टी करत फराळावर ताव मारतात. काही उत्साही लोक पहाटे फटाक्यांची आतषबाजी करून आसमंत दुमदुमवतात आणि दिवाळी सुरू झाल्याची जणू सगळीकडे दवंडीच पिटवतात.

आश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो. घरोघरी लोक पारंपरिक कपडे परिधान करून समृद्धी व ऐश्वर्य यांचे प्रतिक असणाऱ्या लक्ष्मीची पूजा केली जाते. घर स्वच्छ, निरोगी ठेवायला मदत करणाऱ्या केरसुणीचीदेखील पूजा स्त्रिया न विसरता या दिवशी करतात. आपलं घर धनधान्यांनी, पैशाने व आरोग्याने समृद्ध व्हावे अशी प्रार्थना घरपती केली जाते.कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी काही ठिकाणी बळीची प्रतिमा तयार करून पूजा केली जाते, तर काही ठिकाणी शेणाचा बळीराजा करून त्याची पूजा केली जाते. याच दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला दिवाळी पाडवा घरोघरी साजरा केला जातो. संध्याकाळी पत्नी पाटाभोवती रांगोळी काढून आपल्या पतीचे औक्षण करते व पती पत्नीला प्रेमाने ओवाळणी म्हणून पैसे, दागिने किंवा साडी देतो. पती-पत्नीच्या नात्याला दृढता आणणारा हा दिवस असतो.

त्यानंतर येते भाऊबीज. भावाबहिणीतले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढविणारा दिवस. बहीण भावाला ओवाळून त्याच्या मांगल्याची, समृद्ध आयुष्याची कामना करते, तर भाऊ ओवाळणी देऊन आयुष्यभर तिच्या सुख-दु:खात आपण सहभागी असल्याची ग्वाही देत असतो. आजही भाऊ आवर्जून ओवाळून घेण्यासाठी आपल्या बहीणींचे घर कितीही लांबले असले तरी जातात व आपल्या नात्याची विण घट्ट करतात.आनंदाची बरसात करणारी दिवाळी नेमकी शेतकऱ्यांच्या सुगीच्या दिवसात येते. त्यामुळे शेतकऱ्याचे घर सुगीच्या कामात व्यस्त राहते. पावसाळय़ात पेरलेल्या धान्याची कापणी सुरू झाल्याने बळीराजाचं कुटुंब शेतातली धनलक्ष्मी घरी आणण्यात दंग असतं. हे करताना शेतकरी स्त्री दिवाळीला विसरत नाही. गाय-वासराची, शेणा-मातीची पूजा करणं, फराळ बनवणं, अंगण सारवून रांगोळय़ांनी व पणत्यांनी सजवणं या गोष्टीही ती स्त्री आनंदाने करते. हे करण्यामागे आपल्या घरात सुख, समृद्धी यावी व घर आनंदानं नांदावं हीच त्या स्त्रीची अपेक्षा असते.

दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या घरी आनंदी, सकारात्मक वातावरण असतेचं. पण जर असंच आनंदी, उत्साही वातावरण आपल्याला रोजच्या आयुष्यात मिळाले तर.. आपल्या घरी रोजचं दिवाळी होईल.

संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्या प्रमाणे,
‘‘ मी अविवेकाची काजळी।
फेडूनि विवेकदीप उजळी।
ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर।’’

चला तर मग, आपल्या मनातली अविवेकाची काजळी आपण बाजूला सारून विवेकाचा नंदादीप पेटवूया व आपल्या घरी सद्विचारांची अखंड दिवाळी साजरी करूया. शुभ दीपावली.