वास्तुसौंदर्य : गृहसजावटीमध्ये काच एक मूलभूत घटक

आपल्या आयुष्यातल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींची किंमत नेहमीच अधिक असते. बहुतेक वेळा ही किंमत रास्त असूनही आपण ती मोजायला तयार असतो.

आपल्या आयुष्यातल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींची किंमत नेहमीच अधिक असते. बहुतेक वेळा ही किंमत रास्त असूनही आपण ती मोजायला तयार असतो. ती गोष्ट आपल्य स्वत:शी, कुटुंबीयांशी अथवा घराशी संबंधित असते. आपल्या स्वत:पेक्षा आपल्या कुटुंबाचा आणि घराचा विचार आपण अनेकदा प्राधान्यक्रमानं करत असतो. आपल्या कुटुंबाचा आनंद आणि घरातलं आनंदी वातावरण हे आपण नेहमीच मिळवू पाहत असतो. आपण नेहमीच समाधान मानण्यावर असतं असं म्हणतो. परंतु, तरीही आपण पूर्णपणे सर्वच बाबतीत समाधानी राहू शकतो असं नाही. या समाधानाचा संबंध आपल्या मनाशी जोडला जातो. आपल्या सतत बदल होणाऱ्या मानसिकतेशी संबंधित असतो आणि अनेकदा ही आपली बदलत जाणारी मानसिकता आपल्या घरातल्या वातावरणावर अवलंबून असते.
आपण असंही म्हणत असतो, की मनुष्याचा स्वभाव बदलता येत नाही. परंतु, घराच्या अंतर्गत सजावट आणि संरचनेद्वारे विचार बदलता येऊ शकतात. एकूणच घराचा चेहरा-मोहरा बदलला तर निश्चितच घरातलं वातावरण बदललं जाऊ शकतं. घराच्या अंतरंगातल्या बदलामुळे आपलं अंतरंग, अंतर्मन काही प्रमाणात नक्कीच बदलतं, सुधारतं आणि मुख्य म्हणजे ते समाधानी राहू शकतं.
आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये फर्निचरचा मोलाचा वाटा असतो आणि या फर्निचर बरोबरच काचेचं स्थान देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. गृहसजावट आणि एकूणच घर बांधणीमध्ये काच एक मूलभूत घटक असल्याचं मानलं जातं. कोणतंही घर मग ते लाकडाचं असो अथवा दगडाचं असो, मातीचं असो अथवा विटांचं असो, लोखंडी पत्र्याचं असो अथवा सिमेंट काँक्रीटचं असो या घराच्या बांधकामात अथवा अंतर्गत सजावटीत काही प्रमाणात का होईना पण काचेचा वापर केला गेल्याचं आढळतं. घराच्या बाबतीत काच हा एक अविभाज्य घटक असल्याचं समजलं जातं. हल्ली तर अनेक इमारतींना विटांच्या भिंतींच्या ऐवजी दर्शनी भागासाठी पूर्णपणे काच बसवण्याला पसंती दिली जात आहे. शिशमहाल तर इतिहासातील वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असल्याचं मानलं जातं.
अनादीकाळापासून घरबांधणी तसेच गृहसजावट या दोन्हींसाठी मोठय़ा प्रमाणात वापरली जाणारी काच अबाधित राहिली आहे. घर व इतर वास्तू सजवण्यासाठी, खुलवण्यासाठी काच तर वापरली जातेच परंतु दैनंदिन वापरातल्या असंख्य वस्तू बनवताना काचेचा वापर केला जात असल्याचं आपण पाहतो.
जगभरातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू साकारताना पूर्वीच्या काळी देखील काचेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं दिसून येतं. त्या काळी काचेचा वापर अधिककरून अंतर्गत सजावट करण्यासाठी होत असे. विशेषत: राजमहालांमधील प्रत्येक दालनाच्या छताच्या अंतर्गत सजावटीसाठी, भिंतींची सजावट करण्यासाठी काचेच्या लहान लहान आकारातल्या तुकडय़ांचा वापर केला जात असे. प्रत्येक दालनाच्या प्रकाशयोजनेसाठी काचेच्या झुंबरांचा उपयोग केला जात असे. काचेपासून तयार केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू सजावटीसाठी वापरल्या जात असत. काचेच्या साहाय्याने तयार होणारा आरसा देखील मोठय़ा प्रमाणात वापरला जात असे.
आजही या काचेशिवाय आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीचं काम करण्याचा विचारही करू शकत नाही. आपल्या घराच्या खिडक्या, दरवाजे की जे नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा घरासाठी मिळावी म्हणून घराच्या योग्य दिशेला असावे लागतात. नैसर्गिक प्रकाश तर आपण नेहमीच खिडक्यांना काच बसवून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. या व्यतिरिक्त अंतर्गत फर्निचर तसेच इतर वस्तूंची एकूणच संरचना करताना काचेचा अधिकाधिक उपयोग आपण अगदी ठरवून करत असतो. अशा वेळी काचेच्या पारदर्शकता या गुणधर्माचा उपयोग आपल्या संरचनेच्या दृष्टीने उपयुक्त आणि फायदेशीर ठरतो.
घराच्या अंतर्गत सजावटीसाठी अधिक प्रमाणात वापरली जाणारी काच बहुतेक करून पारदर्शकच असते. या पारदर्शकतेमुळे घरातल्या फर्निचरपैकी शोकेस, क्रॉकरीचे कपाट, सेंटर आणि साइड टेबल, पार्टिशन अशा अनेक वस्तू बनवण्यासाठी पारदर्शक काचेचा उपयोग केला जातो. काचेचे विविध प्रकार घराच्या अंतर्गत सजावटीसाठी बाजारामध्ये उपलब्ध असतात. यामध्ये प्लेन ग्लास, फ्रोस्टेड ग्लास, थम्ब ग्लास, डिझाइनर ग्लास, टिंटेड ग्लास, टोमॅटो ग्लास, बायर मेश ग्लास, बेंड ग्लास, टेंपर्ड ग्लास, लॅमिनेटेड ग्लास, टफन्ड ग्लास, ईच्ड ग्लास, पेंटेड ग्लास असे अनेकविध प्रकार बाजारामध्ये उपलब्ध असतात.
प्रत्येक कामाच्या दृष्टिकोनातून खिडक्या-दारे यांना वायर मेश ग्लासची तावदाने बसवणं हितावह ठरतं. अर्थातच अशा काचा पूर्णत: पारदर्शक नसतात. त्यामुळे खिडक्या-दारांना बसवलेल्या अशा प्रकारच्या काचांमुळे घराच्या आतील वस्तू, व्यक्ती, घरात वावरताना होणाऱ्या हालचाली सहजासहजी घराबाहेरून दिसू शकत नाहीत. घराच्या दारे-खिडक्या सर्वसाधारण आकारापेक्षा मोठय़ा असल्यास अशा ठिकाणी टफन्ड ग्लास वापरणं योग्य ठरतं. कोणत्याही कारणास्तव या काचेवर जोरात मार, फटका बसलाच तर काच फुटते जरूर परंतु अशा काचेचे मोठय़ा आकाराचे तुकडे न होता खडीसाखरेसारखा भुगा होतो.
डिझाइनर ग्लास तसेच पेंटेड ग्लास अधिक करून घराच्या फॉल्स सिलिंगसाठी वापरणं उपयुक्त ठरतं. अशा प्रकारच्या काचेच्या माध्यमातून अप्रत्यक्ष स्वरूपाची प्रकाशयोजना करून नाटय़मय वातावरण निर्माण करता येऊ शकतं. टिंटेड ग्लासचा वापर जेवणाच्या टेबल टॉपसाठी, सेंटर अथवा साइडटेबलसाठी, सूर्य प्रकाशाची उष्णता कमी करण्यासाठी खिडक्यांच्या तावदानांसाठी करता येतो.
प्रत्येक प्रकारच्या काचेचं महत्त्वं, गुणधर्म, वैशिष्टय़ लक्षात घेऊन निवड करणं आवश्यक असतं. सध्या बाजारात काचसदृश अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. परंतु, एकूणच काचेच्या गुणधर्माशी त्या वस्तूंची तुलना होऊ शकत नाही. काचेला पर्याय हुबेहूब काचेसारखा परंतु काचेपेक्षा अधिक काळ टिकू शकणारा आजही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीमधली काचेची गरज इतर कोणत्याही वस्तूनं भागवता येणे नाही.
पारदर्शक काचेच्या उपयोगामुळे घरातल्या फर्निचरला वेगळाच उठाव येतो. विशेषत: शोकेसच्या कप्प्यांसाठी तसेच दरवाजासाठी काचेचा वापर केल्यामुळे शोकेसच्या आतल्या बाजूला देखील प्रकाशयोजना करून आतील शोभेच्या वस्तू अधिकच खुलून येतात. काचेच्या वारामुळे फर्निचर तसेच संपूर्ण सजावटीमधली बोजडपणा कमी होतो. हल्ली बेंड ग्लासचा उपयोग करून सेंटर टेबल, साइड टेबल, डायनिंग टेबल, खुर्ची, घरातली एखादी वक्राकारातली भिंत अथवा पार्टिशन बनवले जाते. काचेवर इचिंगच्या माध्यमातून केलेले नक्षीकामही अधिक सुंदर दिसतं. ग्लास ब्रीक्स ही देखील एक निराळी सजावटीची वस्तू आहे.
भिंतीला कान असतात असं आपण अनेक वेळा म्हणत असतो. परंतु काचेचा वापर करून बनवलेल्या भिंतीच्या बाबतीत मात्र त्याला अपवाद आहे. बाहेरून घरात येणाऱ्या तसेच आतून बाहेर जाणाऱ्या सर्व तऱ्हेच्या आवाजाला रोखून धरण्याची क्षमता या काचेमध्ये असते. याचा प्रत्यय आपल्याला आपल्या घराची खिडकी बंद केल्यावर येतो. अशा दृष्टिकोनातून काचेचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.
काचेच्या नाजूकपणामुळे तिच्या वापरावर आपल्याला मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात आणि एकदा फुटलेली काच परत जोडता येत नाही. घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये विशेषत: लहान मुलांच्या तसेच वयस्कर व्यक्तींच्या खोलीत काचेचा वापर मर्यादित प्रमाणात करणं योग्य ठरतं. काचेची निवड करताना ती अतिशय पारखून घ्यावी लागते. प्रथमदर्शनी चांगल्या दर्जाची भासणारी काच कदाचित सदोष असू शकते.
आपल्या घरातला आरसा हा तर सर्वाच्या अत्यंत आवडीचा, पसंतीचा, आकषर्णाचा असाच असतो. दिवसभरातून एकदाही आपलं रूप आरशात न्याहाळलं नाही असं सहसा क्वचितच होत असेल.
आरसा हा देखील काचेपासूनच बनवला जातो. यात प्रामुख्याने तीन प्रकार उपलब्ध असतात. एक प्लेन मिरर, टिंटेड मिरर, वन साइड मिरर. अशा सर्वच प्रकारांचा वापर आपल्या गृहसजावटीसाठी आपण करू शकतो.
गृहसजावटीमध्ये काचेचा वापर जसा फायद्याचा असतो तसा काही वेळा काही प्रमाणात तो तोटय़ाचाही ठरू शकतो. विशेषत: डिझाइनर ग्लास वापरताना याचा प्रत्यय येतो. काही कारणानं घरात बसवलेली डिझाइनर ग्लास फुटली तर तशीच काच पुन्हा मिळेपर्यंत तुटफूट झालेलं सजावटीचं काम भग्नावस्थेत तसेच ठेवावं लागतं.
सिलिका, पोटॅश, सोडा, लाइम, लेड ऑक्साइड या घटकांपासून निरनिराळ्या प्रकारच्या काचेची निर्मिती केली जाते. सर्वसाधारण गुणधर्म याद्वारे मिळू शकतात. परंतु, त्यामध्ये काही वेगळेपण अपेक्षित असल्यास काच बनवताना आयर्न ऑक्साइड, लेड ऑक्साइड, बोरॅक्स या घटकांचं कमी-अधिक प्रमाणातलं मिश्रण मुख्य घटकांमध्ये मिळवून ते साध्य करता येऊ शकतं.
गृहसजावटीच्या इतर वस्तूंच्या किमतीच्या तुलनेनं काच बरीच स्वस्त आणि मस्त असते. आपल्या घरात अगदी लहान लहान फोटोंपासून असंख्य वस्तूंसाठी आणि विविध कामांसाठी काचेचा वापर आपण करत असतो. देखभाल आणि दुरुस्ती या दोन्ही दृष्टीनं अत्यंत काळजी घ्यावी लागणारी अशी ही वस्तू आहे. नेहमीच्या स्वच्छतेप्रमाणे काचेची स्वच्छता करता येते. केवळ तुटफूट झाल्यावर मात्र फुटलेली काच बदलण्याशिवाय अन्य पर्याय नसतो.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अगदी प्रत्येक दालनात काचेचा वापर गरजेनुसार कमी-अधिक प्रमाणात आपण करू शकतो. शोकेस, सेंटर टेबल, साइड टेबल, डायनिंग टेबल, क्रॉकरी युनिट, किचन युनिट, बुक शेल्फ, ड्रेसिंग टेबल, लहान लहान शोभिवंत वस्तू, फोटो फ्रेम्स, घडय़ाळ, फॉल्स सिलिंग, वॉल पॅनलिंग, फ्लॉवर पॉट अशा अनेक वस्तूंसाठी, कामांसाठी काचेचा उपयोग आपण करू शकतो. या व्यतिरिक्त खिडक्या, दरवाजे, पार्टिशन्स, स्टेरकेस रेलिंग पॅनेल्स, विजेच्या दिव्यांची झुंबरे याही कामात काचेचा वापर करता येतो.
आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीच्या कामामध्ये वापरलेली काच आपल्या अंतर्मनाची पारदर्शकताच सुचवत असते. आपले आचार, विचार आणि व्यवहार पारदर्शक असल्याचं काचेच्या वापरातून आपण प्रदर्शित करू शकतो. काचेपासून तयार केला जाणारा आरसा तर आपल्या अंतर्मन आणि आपल्या मनाची होणारी स्थित्यंतरे प्रतििबबित करत असतो आणि त्यामुळे अंतर्गत गृहसजावटीमधला काच हा मूलभूत घटक आपल्या मनाचं, अंतरंगाचं दर्शन घडवण्यासाठी तरी निश्चितच दुर्लक्षित करून चालणार
(लेखक महावीर इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Glass is a basic thing in interior decoration

ताज्या बातम्या