आठवणी येण्याची एक वेळ असावी. एक निश्चित टप्पा असावा. शक्यतो मावळतीच्या दिशा उजळू लागल्यावर.. कर्तव्याची उमेद संपल्यावर.. आपल्या बोलण्याला महत्त्व न उरल्यावर.. आपलाच संवाद आपणाशी होऊ लागल्यावर! आणि आठवणी तरी कोणाच्या येतात? ज्यांनी आठवण्यासारखं मनावर कोरलंय अशांचीच! ती माणसं असोत वा निर्जीव वस्तू वा अन्य!
अजूनही आठवतात बालपणीच्या घराच्या आठवणी. अंबानी बंधूंच्या अ‍ॅन्टालियाची चित्र पाहूनही ‘त्या’ घराची ऊब आजही जाणवते. साठीच्या दशकात वडिलांनी वडिलोपार्जित मालमत्तेवर पाणी सोडून कर्तबगारीने गावठाणच्या जागेवर चार डेलक्यांनी उभ्या केलेल्या बेडय़ा स्वरूपाचे घर कसे उभे केले याच्या साश्रुनयनांनी किती तरी वेळा वडिलांच्या मांडीवर डोके ठेवून कथा ऐकल्या होत्या. मित्रांच्या मदतीने वडिलांनी एका रात्रीत उभ्या केलेल्या आडोशात आईने संसार मांडला होता. या घराच्या कहाणीतून ‘मित्र’ नात्याची वीण कळू लागली.
जाणत्या वयात दिसले ते दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पेंढा शाकारून व्यवस्थित केलेले छप्पर! उन्हाळ्यात आईने सारवलेल्या कुडांनी घर पॅकबंद व्हायचे. थोडय़ाच म्हणजे वीस बाय वीस फूट लांबी-रुंदीच्या जागेवर चारी बाजूंना पडव्या असलेल्या घराला चहूबाजूंनी असणाऱ्या वळचणींनी शोभा यायची. कारवीच्या कुडांना शेणांनी आई इतकी सुंदर सारवायची की, रस्त्यातून जाणारी माणसे, स्त्रिया कौतुक करायची. घराला दारही कुडाचेच. ते कायम उघडेच. घरातील सर्वच माणसे बाहेर पडल्यावर कुत्री, मांजरे घरात शिरू नयेत म्हणून आडोशाची सोय. बाहेरची एक ओटी, जिथे येणारे-जाणारे बसत. थोडक्यात पाहुण्यांसाठी! मधले माजघर किंवा मधघर! इथे घरातील सर्व जामानिमा! कपडे, हडपा, तांदूळ, उखळ, मुसळ, कणगा, जाते, कपडय़ांची वळाणी, दुधाचे शिंके, आमच्या पुस्तकांची थप्पी आणि आतल्या भागात ववरा म्हणजे स्वयंपाकघर! खरे तर हेच आमचे घर! चुलीजवळ बसून आई भाकऱ्या करायची. भाकरी दुरडीत पडायच्या अगोदर ती ताटात पडायची. घराच्या पाठीमागे असलेल्या आवारात लावलेल्या भेंडी-मिरच्यांची भाजी ताटात असे. उन्हाळ्यात शेकटाच्या शेंगाची भाजी असे. स्वयंपाक करण्याच्या आनंदापेक्षा आम्ही जेवताना पाहणे हाच आईचा आनंद असे. तिने आम्हाला जेवणाच्या वेळा शिकवल्या नाहीत, की कधी जेवणासाठी कोणाला थांबवले नाही. तुला हे आवडले का? तुझ्यासाठी हे करू का? असेही तिने कधी विचारले नाही. मुलांच्या खाण्यावरून तिला सारे कळायचे!
घराच्या पाठीमागे बरीच मोकळी जागा होती. वडिलांनी तिथे लिंबाचे झाड लावले होते. खूप लिंबे यायची. आई गावभर लोणच्यासाठी वाटायची. ती खूप सुंदर लोणचे मुरवी. गावातील बऱ्याच जणी तिच्याकडून हे काम करून घेत. याच आवारात शेकटाची झाडे होती. अडल्यानडल्या वेळी शेंगांची भाजी, फुलांची भाजी केली जाई. याच आवारात आमच्या अंघोळीचा कार्यक्रम (सनबाथ) चाले. या संपूर्ण आवाराला वई (कुंपण) केले जाई. म्हणजे पावसाळ्यात लावलेल्या भाज्या जनावरांपासून सुरक्षित तर राहतच; परंतु वेलवर्गीय भाज्या कुंपणावर भरपूर येत. शिराळे (दोडके), घोसाळे (गिलके), डांगर (लाल भोपळा), कोहळे, कारली, घेवडा यांना कमी नसे. कोणाच्या घरात भाजी नसली तरी शेजारच्या वईवरची भाजी काढणे गुन्हा नसे. तो माणुसकीचा धर्म होता.
दोघे भाऊ मोठे झाल्यावर वडिलांना कामात मदत करू लागले. घरासमोरच्या अंगणात वडिलांनी लाकडाचा मंडप घातला. त्यावर सागाची पाने आणि पेंढा टाकला. भर उन्हात अंगणातील गारवा हवाहवासा वाटे. वडे (सांडगे), पापड, मिरगुंडी वाळत घालायला जागा मिळे. मिरच्या, मसाल्याचे पदार्थ, पापडय़ा आदी जिन्नस मांडवावर वाळत घालायचे. लहान मुलांना शिडीवर चढून राखण्याचे काम सांगितले जाई.
सकाळपासून ऊन डोक्यावर येईपर्यंत काम करून थकलेले वडील मांडवात येऊन विसावयाचे. वळचणीला टेकून पाय पसरून रस्त्याकडे पाहात राहायचे. त्याच वेळेस शेजारच्या गावातून सरपण आणण्यासाठी पहाटेच शिदोबाच्या डोंगरात गेलेल्या माणसांची रांग लागे. डोक्यावर फाटय़ाचा भारा घेऊन डोंगर उतरलेल्या या माणसांना वडील आग्रहाने थांबवायचे. पाणी पिण्यासाठी आग्रह करायचे. तंबाखू-चुना पुढे करीत. स्वत:चा चहा झाला असला तरी बाहेरूनच आईला चहा करण्यासाठी सांगत. मांडवाची गार सावली ओझेकऱ्याला शांत करी. घरात कधी कधी गूळ-चहा नसायचा. आई पदराखालून शेजाऱ्याकडून उसने आणायची. आमच्या हातात कप-बशी द्यायची. वडील आग्रहाने त्या कष्टकरी माणसांना चहा द्यायचे. वडिलांच्या या स्वभावामुळे आई वैतागायची; पण वडिलांचा स्वभाव बदलला नाही. आमच्यासाठी ते पूर्वसंचित ठरले आहे. पुढे कधी तरी घराच्या कुडांना रंग दिला. मातीच्या हिरव्या-गुलाबी रंगांनी घर नवीन बनले. रंगांची दिवाळी झाली. येणारे-जाणारे घराच्या नीटनेटकेपणाची स्तुती करीत. आईचे सारवणे इतके सुंदर असायचे की, बस्स! वडील जमीन घालताना (भुई) मुरुम वापरायचे नाहीत. त्यामुळे भुई सपाट नि गुळगुळीत होई. अशा जमिनीवर नुसती पाठ टेकली तरी दिवसभराचा शिणवटा जात असे.
घरात अस्वच्छता नको म्हणून वडिलांनी कोंबडय़ा पाळल्या नाहीत. मग कधी तरी या घरात पलंग आला. पलंगावर बसून किती तरी वेळा पाय हलवले. पलंगावर झोपण्याच्या पाळ्या लावल्या. सन १९७६ ला घरात लाइट आले. सन १९८५ ला गोबरगॅस आला. मोठय़ा भावाच्या मदतीमुळे घराच्या उत्पन्नाला हातभार लागू लागला.
शिक्षणासाठी बाहेर असताना घराची आठवण येईच, पण मित्रांच्या घरी गेल्यावरही स्वत:चेच घर दिसे. आज घर नव्याने बांधलंय. घरांची उंची वाढवलीय. किमती व चकचकीत रंग दिलाय. सोयींना कमी नाही, पण त्या घराची ऊब नाही. छोटय़ा घरातील माणसांची उदार मने हरवली आहेत असे सारखे वाटत राहते. चहा-साखर आहे, पण चहा पिणारी माणसे नाहीत. भाज्या आहेत, पण खाव्याशा वाटत नाही.. घरं म्हणजे नुसत्या भिंती नव्हेतच. घराचे घरपण माणसाच्या परस्पर संबंधांवर आधारलेले असते. परिवर्तन हा जगाचा नियम मानला तर वस्तुस्थिती स्वीकारणे एवढाच पर्याय हाती उरतो, पण आठवणी मात्र आपल्या असतात, त्या आपण केव्हाही आळवू शकतो.
तुळशीवृंदाची निर्मिती करण्याची ऐपत असून, तुळशीला जगण्याची हमी उरली नाही. कशाचाही इव्हेण्ट होण्याच्या काळात अंगणातल्या कोपऱ्यातील ‘त्या’ तुळशीच्या रोपटय़ाची, तिच्या मंजुळांची, पानांच्या वासाची खूप आठवण येते. लोणी कढवताना टाकलेली पाने खातानाची चव जिभेवर रेंगाळते. सारे घर आठवणीची शाल पांघरते. डोळ्यांत तरळणाऱ्या पाण्यात घराचे चित्र हलताना दिसते.

Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
Shani Vakri 2024
शनिदेव १३९ दिवस ‘या’ राशींना देणार अपार धन? शनिदेवाच्या उलट्या चालीने होऊ शकतात लखपती
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो