लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेच्या भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पोलिसांनी शहा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ४ एप्रिल २०१४ रोजी प्रचारादरम्यान शहा यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. मुज्जफरनगर दंगलीतून आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे, असे वक्तव्य केल्याचा शहा यांच्यावर आरोप आहे. निवडणूक आयोगाने ‘बदला’ या शब्दाला आक्षेप घेत हे प्रथमदर्शनी   आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले होते. शहा यांनी मात्र आपण आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा दावा केला होता.  
भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर -गेहलोत
जयपूर:  राजस्थानात १३ सप्टेंबर रोजी विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून त्या निवडणुकीत लाभ उठविण्यासाठी सत्तारूढ भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केला आहे.