महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ काही विशिष्ट घराण्यांच्या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून विदर्भातील पूर्वीचा भद्रावती व सध्याचा वरोरा या मतदारसंघावर देवताळे घराण्याचे वर्चस्व आहे. १९६२ ते १९७२ पर्यंत रामचंद्र देवतळे ते दादासाहेब देवतळे यांनी भद्रावतीचे प्रतिनिधीत्व केले. काँग्रेसमधील फुटीनंतर १९७८ ला झालेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे उमेदवार म्हणून निळकंठराव शिंदे निवडून आले आणि पहिल्यांदा देवतळे घराण्याला पराभव पत्करावा लागला. १९८० ला दादासाहेब देवतळे इंदिरा काँग्रेसचे उमेदवार झाले, परंतु मोरेश्वर टेमुर्डे यांनी त्यांचा पराभव केला. १९९० मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला. परंतु जनता दलाचे उमेदवार म्हणून टेमुर्डे दुसऱ्यांदा विजयी झाले.
भद्रावती मतदारसंघावरील देवतळे घराण्याची सद्दी संपली, असे वातावारण असतानाच १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत संजय देवतळे यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवून पुन्हा हा मतदारसंघ आपल्या घराण्याकडे आणला. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये पडलेली फूट, राष्ट्रवादीविरोधी झालेली लढत, तरीही देवतळे विजय झाले. २००४ च्या निवडणुकीत त्यांचा एकतर्फी विजय झाला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भद्रवतीचा वरोरा मतदारसंघ झाला. या मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांच्यापुढे शिवसेनेने आव्हान उभे केले, त्यामुळे त्यांचा निसटता विजय झाला. सलग चारवेळा निवडून येऊनही देवतळे यांना काँग्रेसने सत्तेपासून दूरच ठेवले. शांत, संयमी, निरुपद्रवी, हा स्वभाव त्यांची निवडून येण्यासाठी ताकद ठरली, परंतु सत्तापद मिळण्यासाठी ती निरुपयोगी ठरली. एकदा-दोनदा निवडून आलेले आमदार मंत्री होत होते, परंतु देवतळे कोणत्या तरी समितीचे अध्यक्ष असायचे, सभागृहात अहवाल सादर करायचे, एवढेच त्यांचे दर्शन घडायचे. अखेर  पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. तरीही अमूकच खाते पाहिजे अशी खळखळ त्यांनी केली नाही. पदरी पडले पवित्र झाले या भावनेने त्यांनी मंत्रीपद स्विाकारले, त्यांच्या कुवतीप्रमाणे काम करीत राहिले. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून त्यांना उमेदवारी दिली परंतु त्यांचा पराभव झाला. नरेंद्र मोदी लाटेने सारेच भांबावले होते. संजय देवतळे आणि शेजारच्या चिमूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टिवार यांच्या एका कार्यक्रमाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत  सोनिया गांधी, राहुल गांधी, यांच्याबरोबर चक्क सरसंघचालक मोहन भागवत यांचे छायाचित्र झळकल्याने मोठीच खळबळ उडाली होती. त्या वृत्तपत्राने चुकीने भागवतांचे छायाचित्र छापले होते, त्याबद्दल त्यांचे बिल थकवून ठेवले होते, असे एकदा वडेट्टिवार यांनी सांगितले. परंतु संशयाची पाल कुचकुचली. विद्यमान आमदार व मंत्री राहिलेल्या देवतळे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. एवढेच नव्हे तर त्यांच्याच घराण्यातील डॉ. आसावरी देवतळे यांना उमेदवारी दिली. शांत, संयमी देवतळे यांनी बंड पुकारुन रातोरात भाजपची उमेदवारी मिळवली. १९९६२ पासून जनसंघ किंवा भाजपला या मतदारसंघात शिरकाव करता आला नाही. दोनदा निवडणुका लढविल्या, परंतु एकदा १६७८ व १९८५ मध्ये २४७६ मते मिळाली होती. पुढे युती झाल्यानंतर भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. निवडणुकीच्या रणधुमाळीतच युती तुटली.