निवडणुकीच्या रिंगणातील अनेक उमेदवारांनी अगोदर संस्थात्मक कामातून मतदारसंघात आपले राजकीय बस्तान बसविलेले असते. निवडणुकीची उमेदवारी मिळाली, की अवघी संस्था आणि संस्थेची यंत्रणा त्यांच्या प्रचारासाठी उभी केली जाते. या काळात संस्थेचे उद्दिष्ट एकच असते, ते म्हणजे, आपल्या कर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे.. अशा काही निवडक ‘संस्था’निक उमेदवारांविषयी..
एरवी शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी शैक्षणिक कार्यात गुंतलेले असताना निवडणुकीच्या काळात मात्र त्यातील काही संस्थेशी संबंधित असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांच्या कार्यात हातभार लावत असतात. शैक्षणिक संस्था असलेले अनेक उमेदवार रिंगणात असून त्यात एक नाव म्हणजे पूर्व नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी.
सक्करदरा चौकात असलेले कमला नेहरू महाविद्यालय किंवा वर्धा मार्गावरील डी. एड्. महाविद्यालयासह काही संस्था वंजारी कुटुंबीयांच्या असल्यामुळे या संस्थामधील काही कर्मचारी आणि प्राध्यापकाची एरवी महाविद्यालयात शैक्षणिक कार्यात व्यस्त असतात. गेल्या आठवडाभरापासून मात्र या सर्वाची निवडणुकीच्या कामाची लगबग वाढली आहे. काही कर्मचारी भर उन्हातील प्रचार यात्रेत दिसतात, तर काही कर्मचारी प्रचार यंत्रणा आखण्याच्या आणि राबविण्याच्या कामाला लागले आहेत. प्रचार कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नास्त्याची आणि पाणी देण्याच्या व्यवस्थेपासून तर वस्तींमध्ये पत्रके वाटणे, मतदारांशी संपर्क साधणे, निवडणुकीच्या आर्थिक लेखाजोखा सांभाळणे अशी अनेक महत्त्वाची कामे साधारणात: संस्थांमधील कर्मचारी किंवा प्राध्यापकांच्या माथी मारली जातात. अनेकदा इच्छा नसताना नाइलाजास्तव त्यांना ती करावी लागतात.
वंजारी यांच्या प्रचार कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची फारशी वर्दळ दिसतच नाही. त्यांच्या शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी मात्र प्रचार कार्यालयातच ठाण मांडून राबताना दिसतात. दररोजच्या प्रचाराचे नियोजन येथूनच होते. कुठल्या वस्तीमध्ये पदयात्रा काढायची, कोण कोण सोबत राहतील, पदयात्रेच्या वेळी झेंडे, बॅनर, बिल्ल्यांचे वाटप केले गेले की नाही, या सर्व गोष्टीवर देखरेख ठेवण्यासाठी महाविद्यालयातील निवडक विश्वासू कर्मचाऱ्यांची फौज तयार करण्यात आली आहे. शिवाय निवडणुकीच्या कामात लागणारा आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारीही महाविद्यालयातील विश्वासू प्राध्यापक किंवा कर्मचाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे. वंजारी यांच्या प्रचार कार्यालयाएवढीच लगबग अलीकडे त्यांच्या महाविद्यालयातही दिसून येते. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्येसुद्धा निवडणुकीची चर्चा आणि उत्सुकता दिसते. एरवी प्रसार माध्यमांकडे शिक्षणविषयक बातम्यांची पत्रके घेऊन जाणारे महाविद्यालयाचे कर्मचारी गेल्या चार-पाच दिवसांत मात्र प्रचाराच्या प्रसिद्धीची पत्रके पाठविण्यासाठी धावपळ करीत आहेत. प्रचार आणि प्रसारासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात आली असून त्यासाठी शैक्षणिक संस्थामधील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. महाविद्यालयातील काही प्राध्यापकांना १५ ऑक्टोबपर्यंत निवडणुकीच्या कामात सहकार्य करा, असे व्यवस्थानाकडून बजावण्यात आले आहे. वंजारी हे काँग्रेसचे युवा नेते असून त्यांच्यामागे युवाशक्ती असली तरी महाविद्यालयातील काही विद्यार्थी वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या प्रचार कार्यात सहकार्य करीत असल्याचे चित्र दिसून आले.