गेल्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा चित्रपट अभिनेत्यांचे वलय मोठे होते. वेगवेगळ्या पक्षांच्या रॅलीमध्ये स्टार अभिनेते चमकताना दिसत होते. मात्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी तुटल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार देतानाच दमछाक झाली असून प्रचारात चित्रपट अभिनेत्यांना आणण्याच्या भानगडीत कोणताच पक्ष पडलेला दिसत नाही.
भाजपने सोशल मीडियाचा यावेळीही पुरेपूर वापर करताना नंदीबैलापासून वासुदेवापर्यंत पारंपारिक प्रचारावर भर दिला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार एकीकडे सोशल मीडियाचा वापर करत आहेत तर दुसरीकडे घरोघरी जाऊन थेट प्रचार करण्याला प्राधान्य देत आहेत. गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होण्याच्या दृष्टीने चित्रपट अभिनेत्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुरते स्पष्ट झाले होते.  मनसेने निर्माता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना लोकसभा निववडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
 महेश मांजरेकरांच्या प्रचारात सचिन खेडेकरपासून हिंदी व मराठीतील अनेक अभिनेते प्रचारयात्रांमध्ये सामील होऊनही मांजरेकर यांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. नरेंद्र मोदी यांच्या झंजावातापुढे अभिनेत्यांना कोणतीच किंमत राहिली नव्हती. हा अनुभव लक्षात घेऊन यावेळी जवळपास प्रत्यक पक्षाने आपल्या प्रचारातून अभिनेत्यांना बाद करून टाकले आहे. नरेंद्र मोदींसारखे स्टार प्रचारक असताना अभिनेत्यांना प्रचारात उतरविण्याची कोणतीच गरज नसल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
शिवसेनेने पक्षात असलेले आदेश बांदेकर तसेच शरद पोंक्षे आदी वगळता बाहेरून कोणताही अभिनेता प्रचार यात्रांमध्ये उतरवलेला नाही. मनसे व शिवसेनेच्या चित्रपटसेनेने गेल्यावेळी वेगवेगळ्या भागात मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांचा प्रचारात वापर केला होता. मात्र यावेळी या दोन्ही पक्षांच्या चित्रपट सेनांना पक्षाच्याच नेतृत्वाने दूर ठेवल्याचे दिसत आहे. एकीकडे नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जोरदार प्रचार करत आहेत तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘करू जिवाचे रान’ म्हणत पन्नासपेक्षा जास्त सभा घेणार आहेत. मनसेचे राज ठाकरे यांनीही शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली असून चौरंगी व पंचरंगी लढतीमुळे उमेदवारांचा सारा भर हा केवळ घरोघरी जाऊन मतदारांसमोर हात जोडून उभे राहण्यावरच राहिलेला आहे.