भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांविरुद्ध रान उठवले. तिरोडा वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघांत त्यांनी मोठी आघाडी घेतल्याने हा बुरूज केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असतानाही ढासळला. विधानसभा निवडणूक समोर ठेवून भाजपने विविध कार्यक्रम घेतले. त्याचा फायदा आता युती तुटल्याने भाजपला होणार असल्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे गोंदिया व भंडारा ही जिल्हा ठिकाणे वगळता कुठेही अस्तित्व जाणवेल अशी परिस्थिती नव्हतीच. त्यामुळे आता चौरंगी लढतीत भाजपसाठी ‘अच्छे दिन..’ची आशा उंचावली असेल. मात्र सहाही विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांविरोधात वातावरण आहे. विधानसभेतील ६ पकी २ जागा कॉंग्रेस, तर ४ युतीच्या खात्यात होत्या.
गोंदिया
लोकसभेत पटेल यांचा घरचा मतदारसंघ असलेल्या या ठिकाणी ६ हजार मतांनी मागे पडल्यामुळे २१ वर्षांपासून आमदारकी भोगत असलेल्या गोपालदास अग्रवाल यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. त्यांना काँग्रेसच्याच काही अपक्षांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार अशोक गप्पू गुप्त पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्यामुळे अग्रवाल यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. बसपने यावेळी दलित मतांवर डोळा ठेवून उमेदवारी मामा बन्सोड यांना दिल्यामुळे पचरंगी लढत रंगतदार होऊन त्याचा फायदा इतर तुल्यबळ उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे येथून विनोद अग्रवाल, तर सेनेकडून माजी आमदार रमेश कुथे उमेदवार आहेत.
अर्जुनी-मोरगाव
खासदार नाना पटोलेंनी बांधणी करून ठेवलेला हा मतदारसंघ गेल्या वेळी अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्यामुळे त्याचा फायदा राजकुमार बडोले यांना झाला. बडोले याच्यांपुढे पंचरंगी लढतीत हा बुरूज वाचविण्याचे आव्हान आहे. या वेळी या मतदारसंघातून दोन माजी प्रथम श्रेणी शासकीय अधिकाऱ्यांना बसप व राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. बसपने येथून माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव मेश्राम यांना, तर राष्ट्रवादीतर्फे माजी जिल्हा कृषी अधीक्षक मनोहरराव चंद्रिकापुरे यांना उमेदवारी दिली आहे. सेनेला स्वत:चा उमेदवार नसल्यामुळे त्यांना भाजपमधून जि.प. सदस्या किरण यशवंत कांबळे यांना आयात करून उमेदवारी द्यावी लागली आहे. काँग्रेसने युवा उमेदवार राजेश नंदागवळी यांना संधी दिली आहे.
तिरोडा
लोकसभा निवडणुकीत भाजपचा आमदार असूनही प्रफुल्ल पटेलांना निसटते मताधिक्य देणारा हा मतदारसंघ. याच कारणामुळे भाजपला येथे आमदार डॉ. खुशाल बोपचे यांना उमेदवारी नाकारावी लागली. येथून भाजपने जि.प. सदस्य विजय रहांगडाले यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातही आता पंचरंगी लढत बघावयास मिळणार असून, कॉंग्रेसतर्फे माजी सभापती पी.जी. कटरे, राष्ट्रवादीकडून महिला उमेदवार राजलक्ष्मी तुरकर, तर सेनेकडून पंचम बिसेन व बसपने दीपक हिरापुरेंना पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे. माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. बहुतांश नवीन चेहऱ्यांमुळे निवडणूकअटीतटीची होण्याची शक्यता आहे.
भंडारा
अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या या मतदारसंघाने लोकसभेत नाना पटोलेंना भरभरून आघाडी मिळवून दिली होती. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिल्यामुळे येथे भाजपने युती तुटण्यापूर्वीपासूनच दावा केला होता. मात्र आता युती दुभंगल्यामुळे येथे भाजपलाही संधी मिळाली असून, भाजपकडून अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतर्फे डॉ. सच्चिदानंद फुलेकर, कॉंग्रेसकडून युवराज वासनिक व बसपतर्फे देवांगणा गाढवे यांना उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही जिल्ह्य़ात मनसे लढत असलेली ही एकमेव जागा असल्याने सेनेच्या आमदाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेतर्फे येथून दीपक खरोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दलित मतांचा ओघ कुणाकडे असेल, हे निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
साकोली
खासदार नाना पटोलेंचा गड समजला जाणाऱ्या या मतदारसंघात नाना पटोलेंच्या मर्जीतील उमेदवार मिळाल्यास फायदा होऊ शकतो, हे हेरूनच भाजपने येथून बाळा काशिवार यांना उमेदवारी दिली आहे. कांँग्रेसतर्फे माजी आमदार सेवक वाघायेच राहणार असून, राष्ट्रवादीतर्फे भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. सेनेतर्फे ऐनवेळी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार कुणबी समाजाचे असल्याने मतांच्या विभागणीत कोण सरस ठरतो, हे महत्त्वाचे ठरेल.
तुमसर
विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेचा फटका बसू नये, याकरीता येथे काँग्रेसने पहिल्या यादीतूनच विद्यमान आमदारांचे तिकीट कापले होते व येथे काँग्रेसमध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या प्रमोद तितिरमारे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने खासदार नाना पटोले यांच्या मर्जीतील जि.प. सभापती चरण वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. येथे राष्ट्रवादी व सेनेला भाजपकडून उमेदवार आयात करावे लागले. राष्ट्रवादीतर्फे भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांना, तर सेनेकडून भाजपचेच राजेंद्र पटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपला पोषक असलेल्या या मतदारसंघात इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे बनलेला खेळ बिघडण्याची शक्यता आहे. माजी खासदार शिशुपाल पटलेंना डावलणेही भाजपला महागात पडण्याची चिन्हे आहेत.