बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी वर्षांनुवर्षे केवळ पराभव आणि पराभवाचेच तडाखे खाणाऱ्या महाराष्ट्रातील पक्षाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तडकाफडकी राज्य कार्यकारिणी व जिल्हा-तालुक्या समित्या बरखास्त करुन टाकल्या आहेत. संघटनात्मक फेररचना होईपर्यंत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांच्याकडे राज्याची सूत्रे देण्यात आली आहेत. राज्यात बसप गेल्या ३० वर्षांपासून निवडणुका लढवत आहे. प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढत असली तरी लोकसभा वा विधानसभा निवडणुकीत अद्याप खातेही उघडलेले नाही.प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्याकडील अधिकार कमी करुन विदर्भ व मराठवाडय़ाची जबाबदारी सुरेश माने यांच्याकडे देण्यात आली होती. आता या वेळी विधानसभेतही पक्षाला पराभवच पत्करावा लागला. काही मतदारसंघांत पक्षाने चांगली कामगिरी दाखविली, तरी एकही जागा निवडून आली नाही. त्यामुळे पक्षनेतृत्व नाराज असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड व उपाध्यक्ष कृष्णा बेले यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत.