सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. पंतप्रधान कार्यालयातील कामे ठप्प ठेवून पक्षाच्या प्रचारासाठी आमच्या पंतप्रधानांचे दौरे सुरू असल्याची खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोबिंवलीतील जाहीर सभेत केली.
राज्यात भाजपकडे चेहराच नाही. राज्यातील भाजप नेत्यांकडे बघून जनता मत देणार नाही म्हणून खुद्द पंतप्रधानांना राज्यात प्रचारसभा घ्याव्या लागत आहेत. आता यापुढील काळात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती या निवडणुकांमध्येही पंतप्रधान भाजपचा प्रचार करताना दिसणार का? असेही राज ठाकरे म्हणाले.
ज्या भाजपला बाळासाहेबांमुळे महाराष्ट्रात बळ मिळाले ते आज आम्हालाच स्वबळाच्या बेळकुट्या काढून दाखवत आहेत. स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडे आहे तरी काय? असा सवाल उपस्थित करत राज यांनी पुन्हा एकदा भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवारांचा पाढाच सभेत वाचून दाखवला.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना युती आणि आघाडीतील सर्व जागांवर यांना उमेदवार कसे मिळाले? असे म्हणत युती आणि आघाडी ऐनवेळी तुटल्याचे दाखवून यांनी जनतेच्या डोळ्यांत धुळ फेकली असल्याचेही राज यावेळी म्हणाले.