गोध्रा हत्याकांडावरुन नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याची मोहीम सुरु असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाम पाठिंबा दिल्याची आठवण करुन देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘राज्यातील जनता महायुतीला सत्ता देण्याच्या तयारीत असताना कर्मदरिद्रीपणा दाखवू नका,’ असे भाजपला ठणकावले. आपल्या खास ठाकरी शैलीत भाजपचे वाभाडे काढत ‘आम्हाला कस्पटासमान लेखाल, तर शिवसेनेचे वाघ तयारच आहेत, ’ असेही सुनावले. मोदींना अडचणीच्या काळात शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या मदतीची आठवण करुन देत ठाकरे यांनी राजकीय खेळी केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत मी सत्ता मिळविणारच, असे प्रतिपादन करीत ही मस्ती नसून शिवसेना कार्यकर्त्यांच्या ताकदीबद्दल विश्वास असल्याचे ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात सांगितले. भाजप-शिवसेनेतील वाद आणि जागावाटप मुद्दय़ावरुन ठाकरे यांनी परखड मतप्रदर्शन केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना उसळलेल्या गोध्रा हत्याकांडामुळे त्यांना पदावरुन हटविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर मोठा दबाव होता. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मत विचारले होते. तेव्हा मोदींचे समर्थन करीत त्यांना हटविले, तर गुजरात हातातून जाईल, असे ठाकरे यांनी अडवाणींना सांगितले होते.  मोदी यांना अडचणीच्या काळात शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या मदतीची आठवण करुन देत तेव्हा तर मोदी यांच्याशी फारशी ओळखही नव्हती, पण ते वाघ आहेत, असे वाटल्याने पाठिंबा दिला होता, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या लाटेवरुन निर्माण झालेला वाद शमत नाही, तोच मोदी यांच्या अडचणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करुन ठाकरे यांनी पुन्हा भाजपला ‘लक्ष्य’ केल्याचे मानले जात आहे.
विचारांची युती
ही युती खुर्चीसाठी झालेली नसून िहदुत्वासाठी होती, ती तुटली, तर मला आनंद नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ‘आतापर्यंत प्रचार सुरु व्हायला हवा होता, पण घासाघीस सुरु आहे, असे सांगून ठाकरे यांनी जागावाटपातील घोळाबाबत नाराजी व्यक्त केली. पहिल्या मराठी महिला राष्ट्रपती होत असल्याने प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता, तो काँग्रेसला दिला नव्हता, असे नमूद करुन प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात निवडलेले पी. ए. संगमा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला कोणी शिकवू नये, असे स्पष्ट  केले.